गुवाहाटी
आसाममध्ये पुराची स्थिती गंभीर बनली असून, राज्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे ४८,५०० पेक्षा जास्त नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. धेमाजी, बिस्वनाथ, दिब्रूगड आणि नलबाडी या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी धेमाजी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन चौहान यांनी दिले. राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, "नुकसान मोठे आहे. घरांचे नुकसान झाले आहे, रस्ते वाहून गेले आहेत आणि शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आम्ही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आणि दीर्घकालीन मदत कार्यावर लक्ष केंद्रित करत आहोत."
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, धेमाजी जिल्हा सर्वात जास्त बाधित झाला असून तेथील ४४,००० पेक्षा जास्त लोक पुरामुळे त्रस्त आहेत. प्रशासनाने दोन जिल्ह्यांमध्ये १३ मदत छावण्या आणि वितरण केंद्रे सुरू केली आहेत, जिथे विस्थापित नागरिकांची काळजी घेतली जात आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या जवानांनी धेमाजीच्या विविध भागांतून आतापर्यंत ७१३ लोकांची सुखरूप सुटका केली आहे.
राज्यातील १७९ गावे पाण्याखाली गेली असून २,११७ हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली असून, ८२,८८३ पेक्षा जास्त पाळीव प्राणी आणि पक्षी बाधित झाले आहेत. आगामी काळात 'एल निनो'चा प्रभाव १२ जिल्ह्यांवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्या दृष्टीनेही सरकार तयारी करत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.