शेवटचा दहशतवादी संपेपर्यंत 'ऑपरेशन सिंदूर' सुरूच राहणार: NSA अजित डोवाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 3 h ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

नवी दिल्ली

देशाच्या संरक्षण इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) या लष्करी कारवाईनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. डिस्कव्हरी वाहिनीच्या आगामी 'डिक्लासिफाईड: ऑपरेशन सिंदूर' या विशेष मालिकेतील मुलाखतीत त्यांनी भारताची आक्रमक संरक्षण रणनीती, देशाचे सार्वभौमत्व आणि सीमेपलीकडील दहशतवादावर भारताची ठाम भूमिका जगासमोर मांडली.

पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने शत्रूच्या हद्दीत घुसून केलेल्या या ८८ तासांच्या लष्करी कारवाईमागील प्रत्येक धोरणात्मक पैलूवर डोवाल यांनी प्रथमच उघडपणे प्रकाश टाकला आहे.

पाकिस्तानचे दहशतवादाला समर्थन आता खपवून घेणार नाही

पाकिस्तानकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादावर थेट प्रहार करताना अजित डोवाल म्हणाले की, सीमेपलीकडून मिळणारे हे समर्थन भारतासाठी आता असह्य झाले आहे.

या कारवाईच्या मूळ हेतूबद्दल सांगताना ते म्हणाले, "पाकिस्तानच्या सैन्याने एक गोष्ट पक्की समजून घेतली पाहिजे, दहशतवादाला त्यांनी दिलेले उघड समर्थन किंवा या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात आलेले त्यांचे अपयश आता आम्हाला अजिबात मान्य नाही आणि ते आम्ही मुळीच सहन करणार नाही."

सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी मर्यादांची बंधने नाहीत

भारताच्या सीमांचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी देश कोणत्या थराला जाऊ शकतो, हे स्पष्ट करताना त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत इशारा दिला.

डोवाल म्हणाले, "एकदा का संघर्ष सुरू झाला, की एका देशाला स्वतःचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी जितके पुढे जाणे आवश्यक आहे, तितके जाण्याची आमची पूर्ण तयारी असते. या गोष्टीला कोणतीही मर्यादा किंवा सीमा नसते. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू शकतो."

जगाला ठणकावून इशारा

भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणातील बदलांचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या संयमाला कोणीही हतबलता समजू नये.

ते म्हणाले, "आम्ही संपूर्ण जगाला अगदी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो, भारताचे औदार्य किंवा भारताची सहनशीलता म्हणजे आमचा कमकुवतपणा, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. परिणामांची अजिबात चिंता न करता भारत मोठे निर्णय घेऊ शकतो, धाडस दाखवू शकतो आणि शत्रूवर अत्यंत तीव्र प्रहार करू शकतो."

शेवटचा दहशतवादी संपेपर्यंत लढा सुरूच राहील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचा संदर्भ देत अजित डोवाल यांनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ एका कारवाईपुरती मर्यादित नाही.

ऑपरेशन सिंदूरच्या भविष्याविषयी बोलताना डोवाल म्हणाले, "जेव्हा देशाचे पंतप्रधान असे म्हणतात की 'ऑपरेशन सिंदूर अजूनही जिवंत आहे', तेव्हा त्यांचा थेट उद्देश हाच असतो की दहशतवादाविरुद्धचा हा लढा तोपर्यंत संपणार नाही, जोपर्यंत शेवटच्या दहशतवाद्याचा पूर्णपणे खात्मा केला जात नाही."