आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये मतदानाला सुरुवात!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आसाममधील सर्व १२६ जागा, केरळमधील १४० जागा आणि पुद्दुचेरीमधील ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. कडक सुरक्षेमध्ये आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक आयोगाने मुक्त, न्याय्य आणि शांततापूर्ण मतदानासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे.

केरळमध्ये १४० विधानसभा जागांसाठी एकूण ८८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यात एकूण २ कोटी ७१ लाख मतदार आहेत. मतदानासाठी ३० हजार ४९५ केंद्रे उभारली असून त्यातील २,०४० केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. सुरक्षेसाठी राज्यभरात ७६ हजार जवान तैनात केले असून त्यांना केंद्रीय दलाच्या १६० कंपन्यांची मदत मिळत आहे.

पुद्दुचेरीमध्ये २९४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. तिथे स्थापन केलेल्या १,०९९ मतदान केंद्रांपैकी २०९ केंद्रे असुरक्षित आणि ५ केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत. या ठिकाणी शांततापूर्ण मतदानासाठी सूक्ष्म निरीक्षकांसह अतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी तैनात केली आहे. पुद्दुचेरीची संस्कृती आणि वारसा दर्शवणारी विशेष थीम-आधारित मतदान केंद्रे तिथे उभारली आहेत. 

यामध्ये केवळ महिलांकडून चालवली जाणारी ३० 'पिंक' मतदान केंद्रे, तरुणांकडून चालवली जाणारी १५ केंद्रे आणि पूर्णपणे दिव्यांग व्यक्तींकडून व्यवस्थापित केलेली २ मतदान केंद्रे आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा आणि किमान सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

आसाममधील १२६ जागांसाठी ७२२ उमेदवार मैदानात असून यात ६६३ पुरुष आणि ५९ महिलांचा समावेश आहे. राज्यात २.५ कोटींपेक्षा जास्त मतदार असून स्त्री-पुरुष प्रमाण जवळपास समान आहे. १८ ते १९ वयोगटातील ६.४ लाखाहून अधिक तरुण मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यभरात एकूण ३१ हजार ४९० मतदान केंद्रे उभारली आहेत. लिंग समावेशकतेवर भर देण्यासाठी यातील ४,०२१ केंद्रांचे व्यवस्थापन पूर्णपणे महिलांकडे सोपवले आहे. पारदर्शकता आणि सुरळीत मतदानासाठी सर्व केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय केली आहे.

दुसरीकडे, तामिळनाडूतील एका टप्प्यातील मतदान आणि पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पश्चिम बंगालमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचाही आज शेवटचा दिवस आहे. या चारही राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशाची मतमोजणी पुढील महिन्याच्या ४ तारखेला होणार आहे.