आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांनी तामिळनाडूतील कल्पक्कम येथील प्रायोगिक फॅस्ट ब्रीडर रिॲक्टरने क्रिटिकॅलिटी (अणू ऊर्जा निर्मितीचा टप्पा) गाठल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले आहे. हे महत्त्वपूर्ण पाऊल देशाच्या स्वदेशी अणुकार्यक्रमातील एक मोठी प्रगती असून दीर्घकालीन ऊर्जा शाश्वततेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
ग्रोसी यांनी आपल्या अधिकृत एक्सवर या यशाचे वर्णन भारताची प्रभावी प्रगती असे केले आहे. इंधन शाश्वतता आणि अणू ऊर्जेच्या भविष्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या अणुकार्यक्रमाच्या सुरक्षित आणि संरक्षित विकासासाठी सहकार्य सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आयएईए प्रमुखांनी आपल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले आहे.
कल्पक्कम येथील हा प्रकल्प भारताच्या त्रिस्तरीय अणुऊर्जा धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. देशातील थोरियमच्या मुबलक साठ्याचा वापर करणे, इंधन कार्यक्षमता वाढवणे आणि आयात केलेल्या युरेनियमवरील अवलंबित्व कमी करणे या उद्देशाने या प्रकल्पाची रचना केली आहे.