पाकिस्तानवर विश्वास नाही; इस्रायलचे भारतामधील राजदूत रुवेन अझर यांचे मोठे विधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
डावीकडून पाकिस्तानचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
डावीकडून पाकिस्तानचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी इराण आणि अमेरिका दरम्यान सुरू असलेल्या शस्त्रसंधी चर्चेत पाकिस्तानच्या मध्यस्थ भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तेल अवीव इस्लामाबादला विश्वासार्ह घटक मानत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने त्यांच्या स्वतःच्या कारणांसाठी इस्लामाबादच्या सेवा वापरण्याचा निर्णय घेतला असावा, मात्र दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाची दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे हेच तेल अवीवचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना अझर म्हणाले, "आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह मध्यस्थ मानत नाही. अमेरिकेने त्यांच्या स्वतःच्या कारणांसाठी पाकिस्तानच्या सुविधांचा वापर करण्याचे ठरवले आहे." ११ एप्रिल रोजी होणाऱ्या अमेरिका-इराण थेट चर्चेपूर्वी त्यांनी हे विधान केले आहे. या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वान्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता आहे. 

ट्रम्प यांच्या टीमने गाझामधील युद्धविरामासाठी कतार आणि तुर्की सारख्या अडचणीच्या देशांसोबत काम केले होते, त्याचप्रमाणे हा पाकिस्तानने घडवून आणलेला प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. निकालाच्या मूळ उद्देशाबाबत अमेरिकेसोबत सुसंगत राहणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

लेबनॉनमधील परिस्थिती
अझर यांनी हिजबुल्ला आणि इराणसोबतचा संघर्ष वेगवेगळा असल्याचे सांगितले. त्यांनी इराणसोबतच्या तात्पुरत्या शस्त्रसंधीला पाठिंबा दिला, मात्र दक्षिण लेबनॉनमधील इस्रायलचे ध्येय पुन्हा अधोरेखित केले. ते म्हणाले, "याचा इराणमधील मोहिमेशी संबंध नाही. लेबनॉनचा प्रश्न येतो तेव्हा दक्षिण लेबनॉनमधून हिजबुल्लाची दहशतवादी यंत्रणा साफ करणे आवश्यक आहे. ही लेबनॉन सरकारची जबाबदारी आहे. इराणच्या बाबतीत सांगायचे तर, ही चर्चा १५ कलमी योजनेतील अटींकडे नेईल अशी आम्हाला आशा आहे."

इस्रायली राजदूतांनी उत्तर सीमेवर हिजबुल्लाच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, "गेल्या काही तासांत इस्रायली हवाई दलाने मोठी मोहीम राबवली आहे. आम्ही संपूर्ण लेबनॉनमध्ये २५० पेक्षा जास्त हिजबुल्ला दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या वर्षी मांडलेल्या शस्त्रसंधीच्या अटी कायम राहिल्या पाहिजेत, याबाबत आम्ही ठाम आहोत. लितानी नदीच्या दक्षिणेला हिजबुल्लाची उपस्थिती आम्हाला मान्य नाही. त्यांचे नि:शस्त्रीकरण व्हायला हवे. लेबनॉन सरकारने केवळ बोलण्यापुरते मर्यादित न राहता हिजबुल्लाची क्षमता नष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी, जेणेकरून आमच्या उत्तरेकडील वस्त्यांवर पुन्हा हल्ले होणार नाहीत."

अमेरिका-इराण शस्त्रसंधी
इराणसोबतच्या शस्त्रसंधीबाबत बोलताना रुवेन अझर यांनी आशा व्यक्त केली की, या चर्चेतून इराणचा अणू कार्यक्रम आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र निर्मिती हे दोन अस्तित्वाचे धोके दूर होतील. "आम्ही अधिकृतपणे या शस्त्रसंधीला पाठिंबा जाहीर केला असून अमेरिका या वाटाघाटींचे नेतृत्व करेल. हे एक सकारात्मक लक्षण आहे," असे ते म्हणाले.

इराणमधील स्थिती
बुधवारी इराणने या नाजूक शस्त्रसंधीला धोका निर्माण केल्याबद्दल इस्रायलला जबाबदार धरले होते. इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवल्यास हा करार कोलमडू शकतो आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव निर्माण होऊ शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी लेबनॉन या शस्त्रसंधीचा भाग नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.