आसाम निवडणूक : भाजपची हॅट्ट्रिक की काँग्रेसचे पुनरागमन? आज ठरणार १२६ जागांचे भवितव्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 

दौलत रहमान

आसाममध्ये आज (९ एप्रिल) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. येत्या पाच वर्षांसाठी राज्याची राजकीय दिशा ठरवणारी ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल. यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडीत थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळेल.

सत्ताधारी भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या तयारीत आहे. उत्तम प्रशासन, लोककल्याणकारी योजना आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर त्यांनी भिस्त ठेवली आहे. दुसरीकडे, काँग्रेसला राज्यात पुन्हा एकदा आपले बस्तान बसवायचे आहे. २०१६ मधील पराभवानंतर गेली दहा वर्षे ते विरोधी बाकांवर आहेत. आता पुन्हा सत्तेत परतण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७२२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील ३१,४९० मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल. राज्यात सुमारे अडीच कोटी मतदार आहेत. यामध्ये सव्वा कोटी महिला मतदार आणि ३१८ नोंदणीकृत तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते गौरव गोगोई, आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवव्रत सैकिया हे प्रमुख उमेदवार आहेत. यासोबतच एआययूडीएफचे प्रमुख आणि अत्तर व्यावसायिक बद्रुद्दीन अजमल, माहिती अधिकार कार्यकर्ते अखिल गोगोई आणि आसाम जातीय परिषदेचे (एजेपी) अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षनिहाय उमेदवारांचा विचार केल्यास काँग्रेसने सर्वाधिक ९९ उमेदवार उभे केले आहेत. त्याखालोखाल भाजपने ९० जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. एआययूडीएफ ३० जागा लढवत आहे. एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या असम गण परिषदेने (एजीपी) २६ आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) ११ जागांवर उमेदवार दिले आहेत.

याशिवाय रायजोर दल (१३), एजेपी (१०), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (३), एपीएचएलसी (२), आम आदमी पक्ष (१८), यूपीपीएल (१८), तृणमूल काँग्रेस (२२) आणि झारखंड मुक्ती मोर्चा (१६) हे पक्षही मैदानात आहेत. त्यांच्यासोबतच तब्बल २५८ अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगळी आहेत. अलगापूर-कटलीचेरा आणि करीमगंज दक्षिण या दोन मतदारसंघांत सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी १५ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अतिशय चुरशीची आणि बहुंगी लढत पाहायला मिळेल. याउलट रांगिया, जागीरोड (अनुसूचित जाती), होजाई, नादुआ, जोनाई (अनुसूचित जमाती), डूमडूमा, महमोरा, टियोक आणि लखीपूर या नऊ मतदारसंघांमध्ये केवळ दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होईल.

राजकारणात महिलांचा टक्का वाढवण्याच्या गप्पा मारल्या जातात. मात्र या निवडणुकीत केवळ ५९ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महिलांना उमेदवारी देण्याबाबत पक्षांची उदासीनता यातून दिसून येते. काँग्रेसने सर्वाधिक १४ महिलांना उमेदवारी दिली आहे. त्याखालोखाल भाजपने सात महिलांना तिकीट दिले आहे.

काही मतदारसंघांमधील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जालुकबारी मतदारसंघातून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सलग सहाव्यांदा विजयाच्या शोधात आहेत. जोरहाटमधून गौरव गोगोई पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. नाझिरा हा देवव्रत सैकिया यांचा बालेकिल्ला आहे. तिथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रातील तामुलपूर मतदारसंघातही स्थानिक समीकरणांवर आधारित रंजक लढत पाहायला मिळेल.

याव्यतिरिक्त बिन्नाकांडीतून बद्रुद्दीन अजमल, शिवसागरमधून अखिल गोगोई आणि खोवांगमधून लुरिनज्योती गोगोई हे महत्त्वाचे चेहरे मैदानात आहेत. बोकाखातमधून एजीपीचे अध्यक्ष अतुल बोरा आणि कालियाबोरमधून मंत्री केशव महंत यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने चोख व्यवस्था केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर 'वेबकास्टिंग'द्वारे थेट नजर ठेवली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अनुराग गोयल यांनी दिली. संवेदनशील भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

या निवडणुकीत मतदारांची विविधताही लक्ष वेधून घेते. सुमारे ६.४२ लाख तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच, ८० वर्षांवरील अडीच लाख ज्येष्ठ नागरिकही मतदान करतील. विशेष म्हणजे यात शंभरी पार केलेल्या २,४६६ मतदारांचा आणि २.०५ लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांचाही समावेश आहे.

सत्तेची सूत्रे कुणाच्या हाती?

आकडेवारीच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास, ही निवडणूक म्हणजे दोन भिन्न राजकीय विचारसरणींमधील थेट संघर्ष आहे. भाजपने विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारलेली कायदा व सुव्यवस्था हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले आहेत. तर दुसरीकडे, विरोधी पक्षांनी बेरोजगारी, वाढती महागाई आणि स्थानिक ओळख व नागरिकत्वाच्या प्रश्नांवरून रान उठवले आहे.

अटीतटीच्या लढतींमध्ये प्रादेशिक पक्षांची भूमिकाही निर्णायक ठरू शकते. विशेषतः अप्पर आसाम आणि बोडोलँड भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे. निवडणुकीनंतर सत्तास्थापनेची वेळ आल्यास हे पक्ष 'किंगमेकर'ची भूमिका बजावू शकतात.


हे ही वाचा : इराणच्या लष्करी ताकदीबाबत नेतान्याहूंनी केली ट्रम्प यांची दिशाभूल?


यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. अनेक मतदारसंघांमध्ये विजयाचे अंतर खूप कमी असू शकते. त्यामुळे आसामचा हा निकाल राज्याच्या बदलत्या आणि गुंतागुंतीच्या राजकीय स्थितीवर नक्कीच नव्याने प्रकाश टाकेल.

(लेखक 'आवाज द व्हॉइस -आसाम'चे संपादक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter