८ एप्रिलला वॉशिंग्टन डीसी मधील व्हाईट हाऊसबाहेर निदर्शकांनी झेंडे आणि फलक घेऊन अमेरिकेच्या इराणमधील लष्करी कारवाईचा निषेध केला. या आंदोलनावेळी नॅशनल गार्डचे जवान जवळच उभे होते. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी दिलेली मध्यरात्रीची मुदत पाळली नाही तर इराणमधील संपूर्ण संस्कृती नष्ट होईल, असा इशारा ७ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. त्याच वेळी अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले सुरू केल्याचे वृत्त तेहरानकडून देण्यात आले होते.
इराणने गुरुवारी (९ एप्रिल) हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या जलमार्गाच्या मुख्य भागात समुद्री सुरुंग असण्याचा धोका असल्याचे इराणने म्हटले आहे. दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचा भाग म्हणून इराणने ही सामुद्रधुनी तात्पुरती खुली करण्यास संमती दिली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी १/५ भाग याच मार्गावरून वाहून नेला जातो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (८ एप्रिल) उशिरा सांगितले की, जोपर्यंत खरा करार होत नाही, तोपर्यंत इराणजवळ तैनात असलेले अमेरिकन सैन्य तिथेच राहील. वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये सध्या दोन आठवड्यांचा अत्यंत नाजूक युद्धविराम सुरू झाला आहे.
इस्रायलने लेबनॉनवर भीषण बॉम्बफेक सुरू केल्यामुळे बुधवारी (८ एप्रिल) अमेरिका आणि इराणमधील हा नाजूक युद्धविराम धोक्यात आला होता. इराणने पुन्हा युद्ध सुरू करण्याची धमकी दिली होती. लेबनॉनमधील हिजबुल्लाने गुरुवारी पहाटे उत्तर इस्रायलवर रॉकेट डागले. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धबंदी करार झाल्यानंतर इस्रायलवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे.
मध्यपूर्वेत हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ माजवणाऱ्या या युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी दोन्ही देश वाटाघाटी करण्यास तयार झाले आहेत. दोन आठवड्यांची ही युद्धबंदी आणि चर्चेचा निर्णय झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि तेहरान या दोन्ही बाजूंनी आपला विजय झाल्याचा दावा केला आहे.