‘ATS’चे पुण्यात १९ ठिकाणी छापे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पुण्यातील इसिस 'टेरर फंडिंग' प्रकरणाचा तपास करताना, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आज (शुक्रवार) पहाटे शहरात मोठी कारवाई केली. एटीएसने एकाच वेळी १९ संशयितांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई २०२३ मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या इसिस (ISIS) प्रेरित दहशतवादी मोड्युलच्या तपासाचा एक भाग आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून या १९ संशयितांची नावे समोर आली होती. हे संशयित दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवण्याच्या (Terror Funding) कामात सामील असल्याचा एटीएसला संशय आहे.

आज पहाटेच एटीएसच्या पुणे युनिटच्या अनेक पथकांनी शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी ही छापेमारी सुरू केली. या १९ संशयितांच्या घरांची आणि कार्यालयांची कसून तपासणी करण्यात आली. या धाडसत्रात अनेक मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्ड डिस्क, बँक खात्यांचे तपशील आणि काही संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

एटीएसने या १९ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून 'टेरर फंडिंग'च्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईमुळे पुण्यातील स्लीपर सेल पुन्हा सक्रिय झाले आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.