पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानी दलांनी अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात केलेल्या बॉम्बहल्ल्यात एकाच कुटुंबातील दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये नऊ लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती अफगाण तालिबानचे प्रवक्ते झबिउल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी (२५ नोव्हेंबर) दिली.
हा हल्ला सोमवारी रात्री १२ च्या सुमारास खोस्त प्रांतातील 'गेर्बझवो' जिल्ह्यात झाला. पाकिस्तानी आक्रमणकारी दलांनी स्थानिक रहिवासी विलायत खान यांच्या घरांवर बॉम्ब टाकले. या भयानक हल्ल्यात ५ मुले आणि ४ मुली अशा एकूण ९ बालकांचा आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे घरही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, असे मुजाहिद यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी या हल्ल्यातील मृतांचे विचलित करणारे फोटोही शेअर केले आहेत.
केवळ खोस्तच नाही, तर पाकिस्तानने कुणार आणि पक्तिका या प्रांतांमध्येही हल्ले (raids) केले आहेत. यात चार नागरिक जखमी झाल्याचा दावा मुजाहिद यांनी केला आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा पाकिस्तानमधील पेशावरमध्ये एक दिवस आधीच दुहेरी आत्मघाती बॉम्बस्फोट झाले होते. त्या हल्ल्यात पाकिस्तानच्या निमलष्करी दलाचे तीन जवान मारले गेले होते. पाकिस्तानने त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत. ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यामध्ये भीषण चकमक झाली होती, ज्यात डझनभर लोक मारले गेले होते. २०२१ मध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतरचा हा सर्वात मोठा हिंसाचार होता.
दोन्ही बाजूंनी ऑक्टोबरमध्ये दोहा येथे युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली होती. पण तुर्कस्तानमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरली. अफगाणिस्तानातून पाकिस्तानविरोधी कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद झाल्याने कोणताही दीर्घकालीन तोडगा निघू शकला नाही. आता या ताज्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.