काश्मीरमध्ये लष्करी तळावर हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 9 Months ago
लष्करी तळावर हल्ला
लष्करी तळावर हल्ला

 

लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. राजूरीमधील दुर्गम भागात हा हल्ला झाला आहे. पीआरओ डिफेन्स जम्मूने यासंदर्भातील माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गोळीबार सुरू आहे. भारतीय जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. 'मिंट'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सोमवारी सकाळी लष्कराच्या कॅम्पवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी चार वाजता राजोरी जिल्ह्यातील गुंडा भागात दहशतवाद्यांनी कॅम्पवर हल्ला केला. त्यानंतर भारतीय लष्कराने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यात लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हे हल्ले वाढले असल्याचं बोललं जात आहे.

१९ जुलै रोजी दोन दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा लष्कराच्या उत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. डोडा येथील कस्तीगड भागात देखील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान जखमी झाले होते. त्यानंतर सुरू झालेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.