भाजपकडे लपवण्यासारखे काही नाही

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
अमित शाह
अमित शाह

 

 

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली

 

हिंडेनबर्ग- अदानी प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज याबाबतचे मौन सोडतानाच भाजपला यामध्ये लपविण्यासारखे अथवा घाबरण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटले आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे त्याबाबत भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. हिंडेनबर्ग- अदानी प्रकरणाचे नुकतेच संसदेमध्येही पडसाद उमटले होते. 

 

विरोधकांनी याच मुद्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. राहुल यांच्या संसदेतील ताज्या भाषणाबाबत शहा यांनी त्यांनी काय भाषण द्यावे हे त्यांचे नेते आणि संहिता लेखकांनी ठरवावे, असे म्हटले होते. राहुल यांनी भाजपचे भांडवलशहांसोबत साटेलोटे असल्याचा आरोप केला होता, यावर बोलताना शहा यांनी म्हटले आहे की, ‘‘ आतापर्यंत कोणालाही भाजपवर अशाप्रकारचे आरोप करता आलेले नाही.”

 

काँग्रेसच्या काळामध्ये ‘कॅग’ असो किंवा ‘सीबीआय’ त्यांनी भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे नोंदविले आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये बारा लाख कोटी रुपयांचे गैरव्यवहार झाले होते.’’ भारत घटनात्मक संस्थांवर कब्जा करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता तो देखील शहा यांनी फेटाळून लावला. काँग्रेसने याबाबत न्यायालयामध्ये दाद मागावी. एकही न्यायालय भाजपच्या ताब्यामध्ये नाही. काँग्रेसची मंडळी न्यायालयामध्ये का जात नाहीत? असा प्रश्नही शहा यांनी केला.

 

 


पेगॅससचाही उल्लेख

‘पेगॅसस’च्यावेळी देखील काँग्रेसने पुराव्यासोबत न्यायालयामध्ये जावे असे मी म्हटले होते. याबाबतही त्यांनी केवळ आदळआपट केली. जी मंडळी याबाबत न्यायालयामध्ये गेली त्यांची न्यायालयाने दखल घेतली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे शहा यांनी सांगितले.


जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद संपेल

जम्मू- काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. निवडणुका कधी घ्यायच्या हे मात्र निवडणूक आयोग निश्चित करेल असे शहा यांनी नमूद केले. जम्मू- काश्मीरमधील परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचे सांगतानाच दहशतवादी हल्ल्यांची संख्याही घटल्याचे त्यांनी नमूद केले. काश्मीरमध्ये ज्या वेगाने विकास होतो आहे तो पाहता राज्यातील दहशतवाद देखील संपून जाईल असे शहा यांनी सांगितले.


सगळा देश पंतप्रधानांचे ऐकतो

संसदेच्या कामकाजातून काही वक्तव्ये वगळण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याबाबत बोलताना शहा म्हणाले की, असे करण्याची ही पहिली वेळ नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये संसदीय शब्दांचा वापर होणे अपेक्षित आहे. संसदेमध्ये नेमके काय होते हे सरकार पाहते आहे. पंतप्रधान संसदेमध्ये बोलत असताना सगळा देश त्यांचे भाषण ऐकत असतो. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन हे पाहू शकता.


मोदींचा ईशान्येकडे ५१ वेळा दौरा

ईशान्येकडील भारत सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करताना शहा म्हणाले की, ‘‘ पंतप्रधान मोदी यांनी मागील आठ वर्षांमध्ये ५१ वेळा या भागाला भेट दिली, यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये जी आपण वेगळे आहोत ही भावना निर्माण झाली होती ती संपुष्टात आली आहे. त्रिपुरातील ‘ब्रु’ आणि रियांग समुदायांना अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी राहावे लागत होते. भाजपने त्यांच्या स्थितीमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे.’’