जनगणना २०२७ ला सुरुवात! राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून गणनेचा फॉर्म ऑनलाइन सादर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी राष्ट्रपती भवनात जनगणना २०२७ च्या स्व-गणने (self-enumeration) उपक्रमात सहभाग नोंदवला. राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गृहसचिव गोविंद मोहन, भारताचे महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुर्मू यांनी अधिकृत पोर्टलवर आपल्या कुटुंबाचा तपशील भरला. राष्ट्रपती कार्यालयाने X या समाजमाध्यमावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील बुधवारी उपराष्ट्रपती निवास्थानी जनगणना २०२७ साठीचा आपला स्व-गणनेचा फॉर्म ऑनलाइन पूर्ण केला. उपराष्ट्रपतींनी नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अधिसूचित केलेल्या कालावधीत अधिकृत वेब पोर्टलद्वारे आपल्या घराचा तपशील ऑनलाइन सादर करावा, असे त्यांनी नागरिकांना सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बुधवारी जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होताच आपली स्व-गणना पूर्ण केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बुधवारी दिल्लीतील आपल्या निवासासाठी स्व-गणनेचा फॉर्म भरल्याचे सांगितले. गृह गणना प्रक्रियेचा भाग म्हणून ही जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आहे. भारताच्या विकास प्रवासाला गती देण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावेल आणि सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत करेल, असे शहा म्हणाले.

नवी दिल्ली महानगरपालिका (NDMC) आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट भागात स्व-गणनेसाठी १५ दिवसांची मुदत बुधवारी सुरू झाली. दिल्ली महानगरपालिका (MCD) क्षेत्रासाठी १ मे ते १५ मे या कालावधीत स्व-गणना केली जाईल. प्रत्यक्ष घरी जाऊन घरांची यादी तयार करण्याची मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाईल. 

वेळापत्रकानुसार, NDMC आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट भागात १६ एप्रिल ते १५ मे आणि MCD भागात १६ मे ते १५ जून या दरम्यान ही मोहीम चालेल. जनगणना २०२७ दोन टप्प्यांत पार पडणार असून पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि गृह गणना केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना केली जाणार आहे.