बुलडोझर न्याय हा कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात! - CJI गवई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई

 

न्यायाधीशांना सहसा त्यांच्या स्वतःच्या निर्णयांवर सार्वजनिकरित्या भाष्य करणे योग्य मानले जात नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी शुक्रवारी (आपल्या निरोपाच्या दिवशी) या प्रथेपासून फारकत घेतली. त्यांनी आपल्या न्यायदानातील सर्वात महत्त्वाचे दोन निकाल कोणते, हे स्पष्टपणे सांगितले.

सरन्यायाधीश गवई हे रविवारी निवृत्त होत आहेत. त्यांनी आपले सर्व न्यायदानाचे काम पूर्ण केले आहे, त्यामुळे मी सार्वजनिकरित्या बोलू शकतो, असे त्यांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या (SCBA) निरोप समारंभात सांगितले.

सर्वांत महत्त्वाचा निकाल: 'बुलडोझर न्याय'

सरन्यायाधीश गवई यांना विचारले असता, त्यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा निकाल म्हणून 'बुलडोझर न्याय' (Bulldozer Justice) थांबवणाऱ्या निकालाची निवड केली.

ते म्हणाले, "बुलडोझर न्याय हा कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. एखादी व्यक्ती गुन्ह्याचा आरोपी किंवा दोषी ठरल्यास, तिच्या कुटुंबाचा आणि आई-वडिलांचा काय दोष? निवारेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे." न्यायमूर्ती गवई यांनी भारताची न्यायव्यवस्था कायद्याचे राज्य कसे जपते, हे अधोरेखित करण्यासाठी परदेशातील भाषणांमध्येही या निकालाचा उल्लेख केला होता.

आरक्षण आणि डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान

या पाठोपाठ, त्यांनी नोकरीतील आरक्षणासाठी अनुसूचित जाती (SCs) आणि अनुसूचित जमातींचे (STs) 'उप-वर्गीकरण' (sub-classification) करण्याची राज्यांना परवानगी देणारा निकाल महत्त्वाचा मानला.

ते म्हणाले, "हा निकाल आवश्यक होता. एका मुख्य सचिवाच्या मुलांची तुलना शेतमजुराच्या मुलांशी करणे योग्य नाही, ज्यांना शिक्षण किंवा इतर संसाधनेही मिळत नाहीत." डॉ. आंबेडकरांचे वचन उद्धृत करत ते म्हणाले की, "समानता याचा अर्थ सर्वांना समान वागणूक देणे नाही, कारण यामुळे विषमता आणखी वाढू शकते."

या भेटीत, न्यायमूर्ती गवई यांनी एका आठवण सांगितली. त्यांचा एक लॉ क्लार्क (कायदेशीर सहाय्यक) महाराष्ट्रातील एका अनुसूचित जातीच्या (SC) बड्या नोकरशहाचा मुलगा होता. "माझा निकाल आल्यानंतर त्याने सांगितले की, त्याला आरक्षणाचा फायदा घ्यायचा नाही, कारण SC समुदायातून असूनही, त्याला सर्वोत्तम सुविधा मिळाल्या आहेत."

न्यायिक आणि वैयक्तिक कारकीर्द

न्यायमूर्ती गवई म्हणाले की, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला 'सरन्यायाधीश-केंद्रित' (CJI-centric) ठेवले नाही. संस्थेशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नेहमीच सर्व सहकाऱ्यांशी सल्लामसलत केली.

त्यांच्या अल्प कार्यकाळात उच्च न्यायालयांमध्ये १०७ न्यायाधीशांची नियुक्ती झाली. त्यांनी collegium मधील सहकाऱ्यांचे सौहार्दपूर्ण वातावरण राखल्याबद्दल आभार मानले.

न्यायमूर्ती गवईंच्या कायदेशीर क्षेत्रातील ४० वर्षांच्या कारकिर्दीला (१८ वर्षे वकील आणि २२ वर्षे घटनात्मक न्यायालयाचे न्यायाधीश) डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या न्याय, समानता आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाने प्रेरणा दिली.

यापूर्वी त्यांचे सरन्यायाधीश म्हणून पहिले काम पुणे येथील वनजमिनीचे संरक्षण करणे होते. तसेच, त्यांनी दिलेला शेवटचा निकाल अरावली टेकड्यांच्या आणि परिसराच्या संरक्षणासाठी होता.

समारंभात वरिष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञांनी न्यायमूर्तींच्या नम्र, सहानुभूतीपूर्ण आणि थेट कामाच्या पद्धतीचे कौतुक केले. त्यामुळे कोर्टरूमध्ये झालेला हा निरोप समारंभ दीड तासाहून अधिक काळ चालला.