चीन आणि पाकिस्तानसोबत भारताचे संबंध कायम तणावपूर्ण असतात. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सीमांवर तैनात करण्यासाठी प्रलय बॅलिस्टिक मिसाईलची एक रेजिमेंट खरेदी करण्यास परवानगी दिलीय. या क्षेपणास्त्रामुळे भारताची भेदक क्षमता कैक पटींनी वाढणार आहे.
चीन आणि पाकिस्तानने भारताकडे वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे परिणाम आता प्रलय क्षेपणास्त्राच्या माध्यमातून त्यांना भोगावे लागतील. एलएसी आणि एलओसीवर हे मिसाईल तैनात करण्यात येईल.
संरक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितलं की, भारतीय लष्करासाठी 'प्रलय' ही मोठी उपलब्धी ठरेल. हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किमीपर्यंत मारा करु शकणारे आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खरेदीचा निर्णय म्हणजे देशासाठी मोठा निर्णय आहे.
विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. समुद्रातून हल्ला करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. डीआरडीओद्वारे बनवलेली क्षेपणास्त्रे ही त्यापेक्षा विकसित आणि भेदक असणार आहेत.
मागच्या वर्षी २१ आणि २२ डिसेंबर रोजी दोनवेळा प्रलय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली होती. हे क्षेपणास्त्र पृष्ठभागावरुन मारा करण्याची क्षमता असणारे आहे. हवेमध्ये ठाराविक अंतर कापल्यानंतर मार्ग बदलण्याचीही क्षमता प्रलयमध्ये आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोठी उपलब्धी समजली जातेय.