दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ डॉक्टर दाम्पत्याला सायबर गुन्हेगारांनी तब्बल दोन आठवडे 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) मध्ये ठेवून त्यांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (१० जानेवारी) या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अशी झाली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर दाम्पत्य २०१६ मध्ये अमेरिकेहून भारतात परतले होते आणि तेव्हापासून ग्रेटर कैलासमध्ये राहत आहेत. त्यांची मुले परदेशात स्थायिक आहेत. २४ डिसेंबर ते ९ जानेवारी या काळात सायबर भामट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. पोलिस आणि तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी दाम्पत्याला कायदेशीर कारवाई आणि अटकेची भीती दाखवली.
१५ दिवस सतत पाळत
भामट्यांनी या दाम्पत्याला सतत फोन आणि व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले. "तुम्ही घरातून बाहेर पडू नका, कोणाशी बोलू नका, अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल," अशी धमकी देऊन त्यांना घरातच 'डिजिटल कैद' केले. या काळात भामट्यांनी दबाव टाकून दाम्पत्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल १४ कोटी रुपये ट्रान्सफर करून घेतले.
असा झाला उलगडा
९ जानेवारी रोजी अचानक हे फोन कॉल्स येणे बंद झाले. त्यानंतर या दाम्पत्याला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी दाम्पत्याच्या एकांतवासाचा आणि भीतीचा गैरफायदा घेतला.
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आले, त्या खात्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अनोळखी व्हिडिओ कॉल किंवा अटकेच्या धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.