शिक्षण आणि संस्कृतीचा मेळ साधत करूया भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मीर अल्ताफ

भारत हा केवळ राजकीय इतिहासातून घडलेला एक देश नाही, तर ती एक अशी अखंड संस्कृती आहे जिचा विकास शतकानुशतके विविध धर्म, तत्त्वज्ञान आणि कलांच्या संवादातून झाला आहे. वेदांच्या काळापासून ते बुद्ध आणि महावीरांच्या विचारांपर्यंत, भक्ती चळवळीच्या प्रेमापासून ते सुफी संतांच्या सर्वसमावेशकतेपर्यंत आणि आदिवासींच्या निसर्गज्ञानापासून ते आधुनिक लोकशाही मूल्यांपर्यंत, भारताची ओळख ही एकसुरीपणाची नसून ती सहजीवनाची आहे. अशा पार्श्वभूमीवर, शिक्षणात संस्कृतीचा समावेश करणे ही केवळ एक शैक्षणिक सुधारणा नसून ती आपल्या संस्कृतीची गरज आहे.

आजची शिक्षण पद्धती बऱ्याच अंशी वसाहतवादी आणि औद्योगिक काळातील विचारांवर आधारलेली आहे. यात संस्कृतीला अभ्यासाचा मुख्य भाग न मानता, एक अवांतर विषय म्हणून पाहिले जाते. याचा परिणाम असा होतो की, विद्यार्थी आधुनिक तांत्रिक ज्ञान तर मिळवतात, पण ज्या इतिहास आणि संस्कृतीने आपला समाज घडवला, त्यापासून ते तुटलेले राहतात. शिक्षणात संस्कृतीला पुन्हा स्थान दिल्यास विद्यार्थ्यांना भारताच्या भूतकाळातील समृद्ध वारशाशी जोडले जाण्याची आणि स्वतःला या अखंड प्रवासाचा एक भाग मानण्याची संधी मिळेल.

शिक्षणाचा सांस्कृतिक पाया

भारतातील प्राचीन शिक्षण पद्धती ही संस्कृती आणि नैतिक मूल्यांमध्ये खोलवर रुजलेली होती. गुरुकुल पद्धतीत बुद्धिमत्तेसोबतच नैतिक शिस्त, कला आणि निसर्गाचे भान यावर भर दिला जात असे. नालंदा आणि तक्षशिलासारखी विद्यापीठे ही ज्ञानदेवाणघेवाणीची जागतिक केंद्रे होती, जिथे तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र आणि कला एकाच छताखाली शिकले जात असत. जैन परंपरेने अहिंसा आणि बौद्धिक चर्चेचा भक्कम पाया रचला.

मध्ययुगीन काळात भक्ती आणि सुफी चळवळींनी भारताच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशात मोलाची भर घातली. संत कबीर, मीराबाई, गुरु नानक आणि काश्मिरी कवयित्री लल्लेश्वरी यांनी अध्यात्मिक विचार बोलीभाषेत मांडून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. बुल्ले शाह, ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती, हजरत निजामुद्दीन अवलिया आणि अमीर खुसरो यांसारख्या सुफी संतांनी प्रेम आणि करुण्णेचा संदेश दिला, ज्याने दोन समुदायांना जोडण्याचे काम केले.

हिंदू आणि इस्लामिक परंपरांच्या मिलाफातून एक अशी संस्कृती निर्माण झाली जी आजही भारतीय समाजाची ओळख आहे. इंडो-इस्लामिक स्थापत्यशास्त्र, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि उर्दू-हिंदीसारख्या भाषांचा विकास हे दर्शवतात की सांस्कृतिक देवाणघेवाण ही काही वरवरची गोष्ट नव्हती, तर ती आपल्या संस्कृतीच्या विकासाची मुख्य प्रेरणा होती. मेवातसारख्या भागात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज लालदास आणि शाह चोखा यांसारख्या संतांच्या दर्ग्यावर श्रद्धेने एकत्र येत असत, हे आपल्या इतिहासातील एकतेचे उत्तम उदाहरण आहे.

शीख परंपरेने अध्यात्माला समानता, सेवा आणि सामाजिक न्यायाची जोड दिली. ख्रिश्चन शिक्षण संस्थांनी आधुनिक शिक्षण आणि साक्षरतेच्या प्रसारात मोठे योगदान दिले, तर आदिवासी समाजाने निसर्गाशी जुळवून घेण्याचे ज्ञान जपून ठेवले, जे आजच्या काळात शाश्वत जगण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

वर्गावर्गात संस्कृती जिवंत करताना

जागतिकीकरण आणि डिजिटल युगामुळे जगाची दारे उघडली असली तरी, तरुण पिढी आपल्या स्थानिक ओळखीपासून दूर जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे. शिक्षणात संस्कृतीचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांना जगात वावरताना आपली मुळे घट्ट ठेवण्यास मदत होईल.

भारताच्या कानाकोपऱ्यात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे सांस्कृतिक शिक्षणाचे प्रयोग यशस्वी होत आहेत. काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील गुंडी-खलील गावात एका सरकारी शाळेने स्वतःचे रूपांतर एका सांस्कृतिक केंद्रात केले आहे. तिथे विद्यार्थी आजही पाटीवर लिहिण्याचा सराव करतात, ज्यामुळे त्यांची एकाग्रता आणि सृजनशीलता वाढते. विशेष म्हणजे, या शाळेत एक 'सांस्कृतिक कोपरा' तयार केला आहे, जिथे गावातील जुन्या वस्तू, जसे की बर्फावरून चालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी चपला, जात्याची दगडी, कांगरी आणि हाताने विणलेले गालिचे मांडले आहेत.

काश्मीरमधील पांपोर येथील 'द नेचर स्कूल'मध्ये तर निसर्ग हाच गुरु आहे. तिथे मुले निसर्गाच्या सानिध्यात राहून शाश्वत जीवनशैलीचे धडे गिरवतात. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवात मातीपासून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले, ज्यातून त्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व समजले. ईशान्य भारतातील मेघालयमधील 'जिवंत मुळांचे पूल' (Living Root Bridges) हे आदिवासींच्या निसर्गज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे, ज्याचा समावेश युनेस्कोच्या वारसा यादीत करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

माझे स्वप्न आहे की, लखनौच्या एखाद्या वर्गात मुले मुघल काळातील जाळीच्या नक्षीकामातून भूमिती शिकतील, केरळमधील शाळेत ओणमच्या माध्यमातून पावसाचा अंदाज घेतील, किंवा राजस्थानमधील शाळेत कठपुतलीच्या खेळातून इतिहास समजून घेतील. जेव्हा मुले पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रत्यक्ष अनुभवातून संस्कृती शिकतील, तेव्हाच हा वारसा संग्रहालयात बंदिस्त न राहता जिवंत ज्ञान बनेल.

धोरणात्मक पावले आणि भविष्याची दिशा

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे संस्कृतीला शिक्षणात स्थान देण्यासाठी एक मोठी संधी आहे. या धोरणात भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), अनुभवजन्य शिक्षण आणि सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. सरकार संगीत नाटक अकादमी आणि CCRT च्या माध्यमातून शाळांमध्ये कार्यशाळा घेत आहे. शिष्यवृत्ती योजनेद्वारे कला आणि संगीतातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

पण केवळ धोरण कागदावर असून चालणार नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सांस्कृतिक संस्था, शिक्षण मंडळे आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. शिक्षकांना स्थानिक संस्कृतीचे ज्ञान वर्गात वापरण्यासाठी प्रशिक्षित करावे लागेल.

शिक्षणात संस्कृतीचा समावेश केल्याने भारताची 'एकतेत अनेकता' ही संकल्पना अधिक दृढ होईल. जेव्हा विद्यार्थ्यांना समजेल की हिंदू, बौद्ध, जैन, इस्लामिक, शीख आणि ख्रिश्चन परंपरांनी एकमेकांवर कसा प्रभाव टाकला आहे, तेव्हा ते विविधतेकडे एक अडथळा म्हणून न पाहता एक श्रीमंती म्हणून पाहतील. काश्मीरचे संत शेख-उल-आलम यांचे "अन्न पोश तेलि येलि वन पोशि" (जोवर जंगल आहे तोवरच अन्न मिळेल) हे वचन आजही सर्वधर्मीय लोकांना प्रेरणा देते.

शिक्षणातून संस्कृती रुजवली तर मुलांमध्ये सहानुभूती वाढेल आणि पूर्वग्रह कमी होतील. हे केवळ भूतकाळाचे कौतुक नाही, तर भविष्यासाठी केलेली तयारी आहे. जेव्हा वर्गखोल्या माहिती देणारी केंद्रे न राहता सांस्कृतिक संवादाचे माध्यम बनतील, तेव्हाच आपण एका उज्ज्वल आणि एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण करू शकू.

(लेखक मीर अल्ताफ हे काश्मीरस्थित शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि कवी आहेत. त्यांच्याशी [email protected] या ईमेलवर संपर्क साधता येईल.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter