दिल्ली स्फोट : 'CNG स्फोट' असल्याचा दावा सरकारकडून फेटाळला!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
दिल्लीत झालेल्या कार स्फोटाचे छायाचित्र
दिल्लीत झालेल्या कार स्फोटाचे छायाचित्र

 

दिल्लीत सोमवारी झालेल्या कार स्फोटाचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही, असे सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावरील काही हँडल्सनी हा स्फोट 'CNG' मुळे झाल्याचा दावा केला होता, त्यानंतर सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.

'पीआयबी फॅक्ट चेक'ने (PIB FactCheck) म्हटले आहे की, "काही सोशल मीडिया अकाऊंट्स असा दावा करत आहेत की, स्पेशल सीपी (कायदा व सुव्यवस्था) रवींद्र यादव यांनी दिल्लीतील अलीकडचा स्फोट सीएनजी स्फोटामुळे झाल्याची पुष्टी केली आहे."

"हा दावा खोटा आहे. दिल्ली पोलिसांच्या कोणत्याही अधिकाऱ्याने असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही," असे 'पीआयबी फॅक्ट चेक'ने म्हटले आहे.

सध्या या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याचेही सरकारने म्हटले आहे. "कृपया सतर्क रहा. कोणतीही पडताळणी न केलेली माहिती शेअर करू नका. केवळ अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवा," असे या निवेदनात पुढे म्हटले आहे.

याआधी, 'X' सारख्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया पोस्ट्स फिरत होत्या. त्यात दावा केला होता की, स्पेशल सीपी (कायदा व सुव्यवस्था) रवींद्र यादव यांनी दिल्ली स्फोट सीएनजी स्फोटामुळे झाल्याची पुष्टी केली आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या या तीव्र स्फोटात किमान २० जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या मते, हा शक्तिशाली स्फोट लाल किल्ला परिसराजवळ एका चालत्या ह्युंदाई i20 कारमध्ये झाला. पोलीस आत्मघाती बॉम्बरच्या (Suicide Bomber) शक्यतेसह सर्व संभाव्य अंगांनी तपास करत आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, "हा स्फोट एका चालत्या ह्युंदाई i20 कारमध्ये झाला. त्यात तीन लोक बसले होते. आम्हाला जखमींच्या शरीरावर कोणतीही गोळी (pellet) किंवा छिद्र (puncture) आढळून आले नाही, जे स्फोटाच्या घटनेत असामान्य आहे. आम्ही सर्व अंगांनी तपास करत आहोत."

प्रत्यक्षदर्शींनी या स्फोटाला 'बहिरे करणारा' म्हटले. त्याचा आवाज सुमारे दोन किलोमीटर दूर आयटीओपर्यंत (ITO) ऐकू आला. या स्फोटामुळे जवळच्या वाहनांच्या काचाही फुटल्या.

स्फोटानंतर, पोलिसांनी रात्री उशिरा कारचा मालक मोम्मद सलमान याला ताब्यात घेतले. तपासात असे आढळून आले की, सलमानने ही कार सुमारे दीड वर्षापूर्वी ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती.

नंतर ही गाडी अंबालामधील कोणालातरी विकण्यात आली आणि त्यानंतर ती पुलवामा येथील तारीक नावाच्या व्यक्तीला विकली गेली. पोलीस आता कारच्या मालकीशी संबंधित सर्व व्यक्तींचा शोध घेत आहेत. राष्ट्रीय राजधानीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.