दिल्ली स्फोटानंतर काश्मीर पर्यटनाला ओहोटी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

एप्रिलमधील पहलगाम हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत असलेल्या काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला आता दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाचा दुसरा मोठा फटका बसला आहे. दिल्ली स्फोटात काश्मिरी तरुणांचा, विशेषतः एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर आणि त्यानंतर नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या स्फोटामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला खोऱ्यात झालेल्या लवकर बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढेल, अशी आशा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेकांना होती. मात्र, १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत एका काश्मिरी डॉक्टरने स्फोटकांनी भरलेली कार उडवून दिली, ज्यात १२ जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणात 'व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल'शी संबंधित सहा जणांना अटक केली आहे. या घटनेने पर्यटनाच्या आशेवर पाणी फेरले आहे.

पर्यटकांची संख्या नगण्य

'ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ काश्मीर'चे (TAAK) सरचिटणीस सज्जाद करालियारी यांनी सांगितले, "पहलगामनंतर दिल्ली स्फोट हा आमच्या पर्यटनासाठी दुसरा मोठा धक्का ठरला आहे. पर्यटकांची संख्या खूपच कमी, अपेक्षेपेक्षा जवळजवळ नगण्य आहे."

ते पुढे म्हणाले, "दिल्ली स्फोटात काश्मिरी रहिवाशांचा सहभाग आणि १४ नोव्हेंबरला नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेला अपघाती स्फोट, यामुळे लोक इथे यायला कचरत आहेत."

पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी

२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील बैसरन कुरणात झालेल्या पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यातील बहुतांश पर्यटक होते. यानंतर पर्यटकांनी खोऱ्यातून काढता पाय घेतला होता आणि सरकारने ५० हून अधिक पर्यटन स्थळे बंद केली होती. सुरक्षा आढाव्यानंतर टप्प्याटप्प्याने २८ ठिकाणे पुन्हा उघडण्यात आली. ऑक्टोबरमध्ये पर्यटनाने थोडी गती पकडली होती, पण दिल्ली स्फोटाने पुन्हा सावट आणले.

हॉटेल व्यवसाय ठप्प

काश्मीर हॉटेल्स अँड रेस्टॉरंट ओनर्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष वाहिद मलिक यांनी सांगितले की, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेली थोडी सुधारणा ही केवळ सुट्ट्या आणि सणांमुळे होती. "व्यवसाय आता खूपच कमी आहे. सध्या हॉटेलची ऑक्युपन्सी जेमतेम २ ते ५ टक्के आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी काश्मीरमध्ये विक्रमी ३४.९८ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा पहलगाम घटनेपर्यंत हा आकडा ६ लाखांवर पोहोचला होता, पण त्यानंतर तो काही हजारांवर आला आहे.

हिवाळी हंगामावर आशा

असे असले तरी, पर्यटन व्यावसायिक आणि सरकारने आशा सोडलेली नाही. आगामी हिवाळी हंगाम आणि गुलमर्गमध्ये होणारे 'खेलो इंडिया विंटर गेम्स' यामुळे परिस्थिती सुधरेल, असे त्यांना वाटते.

जे अँड के वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा दरक्षां अंद्राबी म्हणाल्या, "काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ चांगला होता, पण काही दुर्दैवी घटनांमुळे तो कमी झाला. पण मला या हंगामाची आशा आहे. बर्फवृष्टीमुळे हे ठिकाण स्वर्गासारखे दिसते आणि मला वाटते की या हिवाळ्यात कोणतेही हॉटेल रिकामे राहणार नाही."

जम्मू-काश्मीर सरकारचे जनसंपर्क विभाग सध्या गोव्यातील ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सहभागी झाले असून, तिथे राज्याला 'फिल्म शूटिंग डेस्टिनेशन' म्हणून प्रमोट केले जात आहे.