नवी दिल्ली
भारत सरकारच्या 'डिजिटल इंडिया' मोहिमेला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मोहिमेने प्रशासनाची व्याख्या बदलली असून, नागरिकांना सक्षम बनवत सर्वसमावेशक विकासाला गती दिली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. डिजिटल इंडियाने केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर देशाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, डिजिटल इंडियामुळे शिक्षण, आरोग्य, कृषी, व्यापार आणि सार्वजनिक सेवा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ झाल्या आहेत. तंत्रज्ञानाचा वापर आता 'ईज ऑफ लिव्हिंग' (Ease of Living) साठी एक प्रभावी साधन बनले आहे. डिजिटल पेमेंट आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) मुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे मदत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल इंडियाने नवोपक्रमाची (Innovation) लाट भारताच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः गावे आणि छोट्या शहरांमध्ये पोहोचवली आहे. देशातील तरुण उद्योजक आणि स्टार्टअप्स जागतिक आव्हानांवर उपाय शोधत आहेत. एआय (AI), सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात भारत वेगाने प्रगती करत आहे, ज्यामुळे विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत.
२०१५ पूर्वी सरकारी कामांसाठी रांगांमध्ये उभे राहावे लागत असे, परंतु डिजिटल इंडियाने ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज भारत जागतिक रिअल-टाइम डिजिटल पेमेंटमध्ये आघाडीवर असून, जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ४९ टक्के व्यवहार एकट्या यूपीआय (UPI) द्वारे हाताळले जात आहेत. ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा विस्तार आणि स्वस्त इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे डिजिटल दरी कमी झाली असून, 'विकसित आणि आत्मनिर्भर भारता'चा पाया भक्कम झाला आहे, असे मोदींनी अधोरेखित केले.