जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पुन्हा एकदा पाकिस्तानी ड्रोनचा वावर दिसून आला आहे. गेल्या ५ दिवसांत भारतीय हद्दीत ड्रोन दिसण्याची ही तिसरी घटना आहे. बुधवारी रात्री उशिरा मेंढर सेक्टरमध्ये हे ड्रोन घिरट्या घालताना आढळले. सीमेवर तैनात असलेल्या सतर्क भारतीय जवानांनी तात्काळ कारवाई करत ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला.
या घटनेनंतर लष्कराने संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे किंवा अमली पदार्थ खाली टाकले गेले आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे. याआधी शनिवारी पूंछ सेक्टरमध्येच आणि त्यानंतर रविवारी सांबा जिल्ह्यातही ड्रोन दिसले होते. सांबा येथेही सुरक्षा दलांनी ड्रोन पाडण्यासाठी गोळीबार केला होता. शनिवारी रात्री पूंछमधील जंगलात काही संशयास्पद हालचाल आणि आवाज जाणवल्याने जवानांनी गोळीबार केला होता.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकताच या वाढत्या प्रकारांबद्दल पाकिस्तानला कडक शब्दांत समज दिली होती. घुसखोरीचे प्रमाण कमी झाले असले, तरी पाकिस्तान आता ड्रोनचा वापर करून अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे भारतीय हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आपण त्यांना स्पष्ट सांगितले असल्याचे जनरल द्विवेदी यांनी नमूद केले होते. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून अशा कुरापती सुरूच आहेत.