परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर हे रविवारपासून फ्रान्स आणि लक्झेंबर्ग या देशांच्या ६ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा ४ जानेवारी ते १० जानेवारी दरम्यान पार पडणार आहे.
फ्रान्समधील आपल्या मुक्कामादरम्यान एस. जयशंकर हे फ्रान्सच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेणार आहेत. तसेच, ते फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरो (Jean-Noël Barrot) यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. या बैठकीत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी (Strategic Partnership) अंतर्गत झालेली प्रगती आणि महत्त्वाच्या प्रादेशिक व जागतिक घडामोडींवर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
या दौऱ्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, परराष्ट्र मंत्री जयशंकर पॅरिसमधील फ्रेंच राजदूतांच्या ३१ व्या परिषदेला 'गेस्ट ऑफ ऑनर' (सन्माननीय अतिथी) म्हणून संबोधित करतील. या परिषदेत ते जागतिक मुसद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याबाबत भारताचा दृष्टिकोन मांडतील. तसेच, पुढील महिन्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या संभाव्य भारत दौऱ्याच्या तयारीचा आढावाही या वेळी घेतला जाण्याची शक्यता आहे. मॅक्रॉन नवी दिल्लीतील 'एआय इम्पॅक्ट समिट २०२६' साठी भारत भेटीवर येण्याची शक्यता आहे.
फ्रान्सचा दौरा आटोपून जयशंकर लक्झेंबर्गला रवाना होतील. तिथे ते लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल (Xavier Bettel) तसेच इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर या चर्चेचा भर असेल. लक्झेंबर्गमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाशीही ते संवाद साधणार आहेत. भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील मुक्त व्यापार कराराचा (FTA) वाटाघाटीचा टप्पा निर्णायक वळणावर असताना हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.