रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कुर्बानी करू नका - शाही इमाम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
जामा मस्जिदचे नायब शाही इमाम मौलाना सय्यद शबान बुखारी
जामा मस्जिदचे नायब शाही इमाम मौलाना सय्यद शबान बुखारी

 

ईद-उल-अधा (बकरीद) च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मस्जिदचे नायब शाही इमाम मौलाना सय्यद शबान बुखारी यांनी मुस्लिम समुदायाला विशेष आवाहन केलं आहे. त्यांनी स्वच्छता राखण्याचं आणि मोकळ्या जागा, रस्ते किंवा रस्त्यांवर कुर्बानी (प्राण्यांचा बळी) न देण्याचं सांगितलं.

मौलाना बुखारी यांनी अधिकृत निवेदनात म्हटलं की, ईद-उल-अधा दरम्यान मुस्लिमांनी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पाळाव्यात. “कोणत्याही कृतीमुळे सहनागरिकांच्या भावना किंवा श्रद्धांना ठेच पोहोचू नये. कुर्बानी केवळ घरात किंवा नियुक्त बंदिस्त जागेत करावी, रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, कुर्बानीचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नयेत आणि सोशल मीडियावर टाकू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला.

“इस्लाम हा शांततेचा धर्म आहे. आपल्या वर्तनातून हे दाखवणं, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणं, ही आपली जबाबदारी आहे,” असं ते म्हणाले. कुर्बानी ही आध्यात्मिक महत्त्वाची धार्मिक कृती असून, सक्षम व्यक्तींनी ती अनिवार्यपणे पार पाडावी, यावरही त्यांनी भर दिला.

मौलाना बुखारी यांनी पुढे सांगितलं की, ज्याप्रमाणे भारतात होळी आणि दिवाळी सण सन्मानाने साजरे केले जातात, त्याचप्रमाणे ईद-उल-अधा सुद्धा आदर आणि श्रद्धेने साजरा करावा. इस्लाम सर्व धर्मांचा आदर शिकवतो आणि इतरांच्या भावनांना दुखावण्यास मनाई करतो, त्यामुळे कुर्बानी कायदा आणि सांप्रदायिक सौहार्द राखून करावी, असं त्यांनी आवाहन केलं.

यापूर्वी सोमवारी, ईदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनी १२ मुद्द्यांचं मार्गदर्शन जारी केलं, ज्यात स्वच्छता, आदर आणि सामाजिक जबाबदारीवर भर आहे. त्यांनी कुर्बानीच्या प्राण्याचं रक्त नाल्यात न सोडता मातीत पुरावं, जेणेकरून ते वनस्पतींसाठी खत म्हणून काम करेल, असं सांगितलं. तसंच, कुर्बानीचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू नयेत, असंही त्यांनी सुचवलं.

ईद-उल-अधा, ज्याला ‘कुर्बानीचा सण’ किंवा बकरीद म्हणतात, इस्लामी चांद्र कॅलेंडरच्या धु अल-हिज्जा महिन्याच्या १०व्या दिवशी साजरा होतो. हा सण हजरत इब्राहिम यांच्या अल्लासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या तयारीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारतात मुस्लिम नवीन कपडे परिधान करतात, खुल्या मैदानात नमाज अदा करतात आणि बकरी किंवा मेंढीची कुर्बानी देऊन मांस कुटुंब, शेजारी आणि गरजूंमध्ये वाटतात. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter