३० मे पासून महाराष्ट्र, दिल्लीसह १६ राज्यांत मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

निवडणूक आयोगाने गुरुवारी देशातील १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा (SIR) तिसरा टप्पा राबवण्याची घोषणा केली आहे. ही मोहीम ३० मे पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, याद्वारे मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत केल्या जाणार आहेत.

३६ कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ३.९४ लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) सुमारे ३६.७३ कोटी मतदारांच्या घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करतील. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, ओदिशा, मिझोरम, सिक्कीम, मणिपूर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, मेघालय, झारखंड, नागालँड, त्रिपुरा आणि दादरा नगर हवेली तसेच दमण आणि दीव यांचा समावेश आहे.

बर्फाच्छादित भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील हवामान आणि बर्फवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन तेथील वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे आयोगाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे. यापूर्वी बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि गोवा यांसह अनेक राज्यांमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. आसाममध्येही अशाच प्रकारचे विशेष पुनरीक्षण पूर्ण करण्यात आले आहे.