नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणाव वाढत असताना पाकिस्तानने सलग चौथ्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. २७-२८ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा आणि पुंछ जिल्ह्यांच्या समोरील भागात कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने तात्काळ आणि योग्य प्रत्युत्तर दिले.
शनिवारीही पाकिस्तानी सैन्याने सलग तिसऱ्या दिवशी नियंत्रण रेषेवरील अनेक भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. २६-२७ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने तुतमारी गली आणि रामपूर सेक्टरच्या समोरील भागात कोणतेही कारण नसताना गोळीबार सुरू केला. आपल्या सैन्याने योग्य पद्धतीने गोळीबार करून प्रत्युत्तर दिले, असे भारतीय सैन्याने निवेदनात म्हटले.
२२ एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याच्या सूत्रधारांचा शोध घ्यायला तात्काळ सुरुवात केली आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये आणखी तीन दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
दक्षिण कश्मीरमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणखी तीन संशयित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अशा नऊ घरांचा नाश झाला, असे अधिकाऱ्यांनी रविवारी माध्यमांना सांगितले.
शोपियानच्या झैनापोरा भागातील अदनान शफी दार, पुलवामाच्या दरमदोरा भागातील अमीर नझीर आणि बांदीपोराच्या नाझ कॉलनीतील जमीला अहमद यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली.
हल्ल्यानंतर सरकारने प्रत्युत्तर म्हणून अनेक पावले उचलली. यामध्ये व्हिसा रद्द करणे आणि १९६० च्या सिंधू जल कराराला स्थगिती देणे यासारखी ठोस पाऊले उचलली. पाकिस्ताननेही १९७२ चा शिमला करार स्थगित केला. तसेच भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली.
जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी दहशतवादाविरुद्ध ठाम लढाईला पाठिंबा दिला. त्यांनी सोशल मीडिया X वर लिहिले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद आणि त्याच्या मूळविरुद्ध ठाम लढाई आवश्यक आहे. कश्मीरमधील लोकांनी दहशतवाद आणि निष्पापांच्या हत्येविरुद्ध मुक्तपणे आणि स्वतःहून रस्त्यावर उतरून निषेध केला. या पाठिंब्याचा फायदा घ्यायला हवा. लोकांना दुखावणारी कोणतीही चुकीची कारवाई टाळायला हवी. दोषींना कठोर शिक्षा द्या, त्यांच्यावर दया करू नका. पण निष्पापांना याचा फटका बसू देऊ नका.”