अफगाणिस्तान आणि भारताच्या राजनैतिक संबंधांमध्ये एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. तालिबान राजवटीने नियुक्त केलेला पहिला राजनैतिक अधिकारी अधिकृतपणे भारतात दाखल झाला आहे. मुफ्ती नूर अहमद नूर असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते नवी दिल्लीतील अफगाणिस्तानच्या दूतावासाचा 'चार्ज द अफेअर्स' म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर, दिल्लीतील अफगाण दूतावासाचा ताबा घेणारे ते पहिलेच तालिबान-नियुक्त राजनैतिक अधिकारी ठरले आहेत. 'द हिंदू'ने दिलेल्या वृत्तानुसार, मुफ्ती नूर हे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये तालिबानचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये या नियुक्तीवर सहमती झाली होती.
नवी दिल्लीतील अफगाण दूतावासाची स्थिती गेल्या काही महिन्यांपासून अतिशय बिकट होती. यापूर्वीचे राजदूत फरीद मामुंदझाई आणि इतर कर्मचाऱ्यांनी भारत सोडल्यानंतर दूतावासाचे कामकाज विस्कळीत झाले होते. त्यानंतर हैदराबादचे वाणिज्यदूत महंमद इब्राहिमखिल यांनी दिल्लीतील कामकाजाची जबाबदारी सांभाळली होती. आता मुफ्ती नूर अहमद नूर यांच्या नियुक्तीमुळे दूतावासाला पूर्णवेळ प्रमुख मिळणार आहे.
केवळ दिल्लीच नव्हे, तर याआधी तालिबानने मुंबईतील वाणिज्य दूतावासासाठी इक्रामुद्दीन कामिल (Ikramuddin Kamil) यांची नियुक्ती केली होती. मात्र, दिल्लीतील मुख्य दूतावासाचा ताबा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुफ्ती नूर हे यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत सहभागी होते. त्यांनी देवबंद येथील 'दारुल उलूम' मदरशालाही भेट दिली होती.
भारत सरकारने या घडामोडीवर अतिशय सावध भूमिका घेतली आहे. भारताने अद्याप तालिबान राजवटीला औपचारिक मान्यता दिलेली नाही, तरीही अफगाण जनतेशी असलेले ऐतिहासिक संबंध आणि व्हिसासारख्या तांत्रिक बाबी सुरळीत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या दिल्लीतील दूतावासावर जुन्या राजवटीचा तिरंगा ध्वज कायम आहे, मात्र मुफ्ती नूर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.