ईशान्य भारताला मुख्य भूमीशी जोडणारा सिलिगुडी कॉरिडॉर, ज्याला 'चिकन नेक' म्हटलं जातं, तो आता पूर्वीसारखा कमकुवत राहिलेला नाही. १९४७ च्या फाळणीच्या वेळेस असलेली परिस्थिती आणि आजची स्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, असं स्पष्ट प्रतिपादन माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केलंय. आसाम युनिव्हर्सिटीच्या ३३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या २० वर्षांत या भागात झालेला पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढवलेली सुरक्षा यामुळे या कॉरिडॉरची ताकद वाढली आहे. सीमेपलीकडून 'सेवन सिस्टर्स' हस्तगत करण्याच्या ज्या चिथावणीखोर घोषणा दिल्या जातात, त्या आजच्या वास्तवाशी सुसंगत नाहीत. त्यामुळे अशा विधानांना गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही, असंही नरवणे यांनी स्पष्ट केलं.
भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले की, बहुतेक भागात कुंपण घालण्यात आलंय. मात्र, नद्यांच्या भागातील भूभागामुळे कुंपण घालण्यात काही तांत्रिक अडचणी येतात. अशा ठिकाणी आपली सुरक्षा दलं सतत गस्त घालत असतात आणि डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून असतात. भारताचं धोरण हे कधीच प्रादेशिक विस्तारवादाचं राहिलेलं नाही. आपण शेजारील देशांशी शांततापूर्ण संबंध राखण्यावर भर देतो, पण तिथे होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.
यावेळी जनरल नरवणे यांनी देशांतर्गत सुरक्षेपुढील एका नवीन आव्हानाकडेही लक्ष वेधलं. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एक गंभीर आव्हान असून, केवळ लष्करी कारवाईने हे थांबणार नाही. समाजात असलेली आर्थिक विषमता आणि वंचितपणा दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, जेणेकरून इथला तरुण देशविरोधी शक्तींच्या प्रभावाखाली येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.