मेहसाणा
पाकिस्तानस्थित प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'शी (JeM) संबंधित एका संशयित दहशतवादी मोड्युलचा पर्दाफाश करत, गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) गुरुवारी ५ जणांना अटक केली आहे. पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्यातील खडियाल गावातून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे बिलाल आबिदभाई शेरा, मोहम्मद अयुब काडीवाला, मोहम्मद पालनपुरी ऊर्फ खाली अयुब सुंसारा, शफिया रईस मुक्ती आणि मोहम्मद हसन कार्डिया अशी आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या ८ संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे एटीएसने ही कारवाई केली आहे.
मेहसाणा जिल्ह्यातील काडी येथील न्यायिक दंडाधिकारी आर. एम. भाटिया यांच्या न्यायालयात या पाचही आरोपींना हजर करण्यात आले असता, त्यांना २४ जुलैपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकील पी. आर. दंतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एका आरोपीने 'टाइम बॉम्ब' बनवण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींकडून उर्दू भाषेतील जैश-ए-मोहम्मदचे साहित्य आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करणे बाकी असल्याने पोलीस कोठडी मागण्यात आली होती.
आरोपींनी कच्च्या स्वरूपातील टाइम बॉम्बची चाचणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला होता. या टोळीला बॉम्ब बनवण्याचे साहित्य कोठून मिळाले, ते कुठे लपवले आहे आणि जिहादी पुस्तकांचा पुरवठा कसा होत होता, याचा तपास एटीएस करत आहे. याआधी ३ जुलै रोजी गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून ८ जणांना अटक करण्यात आली होती, जे गुजरातमध्ये दहशतवादी नेटवर्क सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते.