गुजरात सरकारने महागाई भत्त्यात ४ नव्हे ८ टक्क्यांनी केली वाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 6 Months ago
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल

 

सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ८ टक्के करण्यात आला आहे. ही वाढ गुजरात सरकारने केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही मोठी वाढ केली आहे.

केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ४२ टक्के डीएचा लाभ दिला जात आहे. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे.

 

किती लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा?

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, याचा फायदा ९.५० लाख पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या वाढीमुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे भूपेंद्र पटेल यांनी सांगितले. राज्य सरकारने महागाई भत्त्यात एकाच वेळी दोनदा वाढ केली आहे.

८ टक्के डीए वाढ :
महागाई भत्त्यात ८ टक्के वाढ दोन भागात विभागली गेली आहे. पहिली वाढ १ जुलै २०२२ पासून करण्यात आली आणि त्यात ४ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे १  जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दुसरी वाढ करण्यात आली असून त्यातही ४ टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा एकूण डीए ८ टक्क्यांनी वाढणार आहे.

'या' राज्यातही डीए वाढ :
केंद्र सरकारपाठोपाठ तामिळनाडू सरकारनेही नुकतीच डीए वाढ केली आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि इतर काही राज्यांमध्ये ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे.