भाजपप्रणित एनडीए आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर, हिमंता बिस्वा सरमा आज सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याने राज्यातील भाजपचे वाढते वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गुवाहाटीमधील खानपारा येथील पशुवैद्यकीय मैदानावर आज हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत जंगी सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न होईल. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य सकाळी ११.४० वाजता हिमंता बिस्वा सरमा आणि त्यांच्यासोबत चार आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. ५७ वर्षीय सरमा हे आसामच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवणारे पहिले बिगर-काँग्रेस नेते ठरणार आहेत.
सरमा यांच्यासोबत भाजपच्या अजंता नेओग आणि रामेश्वर तेली, तर मित्रपक्ष एजीपीचे अतुल बोरा आणि बीपीएफचे चरण बोरो हे मंत्री म्हणून शपथ घेतील. अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो हे सरमा यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातही सदस्य होते, तर माजी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली पुन्हा राज्य राजकारणात परतले आहेत.
विरोधकांना धोबीपछाड देत ऐतिहासिक विजय
आसाममध्ये एनडीए आघाडीचे हे तिसरे सरकार असेल. २०१६ मध्ये सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा राज्यात एनडीएची सत्ता आली होती. नुकत्याच पार पडलेल्या १२६ सदस्यीय विधानसभा निवडणुकीत एनडीएने १०२ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यामध्ये एकट्या भाजपने ८२ जागा जिंकल्या असून एजीपी आणि बीपीएफ या मित्रपक्षांनी प्रत्येकी १० जागा जिंकल्या आहेत.
आजच्या या सोहळ्यासाठी सुमारे एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गुवाहाटीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मुख्य सचिव रवी कोटा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.