जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यातील दारूबंदीच्या मुद्द्यावर केलेल्या आपल्या वक्तव्याबाबत अखेर माघार घेतली आहे. रविवारी त्यांनी केलेल्या एका विधानावर जोरदार टीका झाल्यानंतर, आपले ते वक्तव्य 'चूक' असल्याचे अब्दुल्ला यांनी मान्य केले आहे.
काय होते उमर अब्दुल्लांचे वक्तव्य?
रविवारी पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीरमध्ये दारूबंदी करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर थेट उत्तर देण्याचे टाळत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. "दारू पिण्याची कोणावर सक्ती केली जात आहे का? ज्यांच्या धर्मात दारू पिण्याची परवानगी आहे, त्यांच्यासाठीच दारूची दुकाने आहेत. ती दारू पिण्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाहीत," असे ते म्हणाले होते.
पीडीपीकडून जोरदार टीका
अब्दुल्ला यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून विशेषतः पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीकडून (PDP) त्यांच्यावर कडाडून टीका झाली. पीडीपीच्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी अब्दुल्ला यांचे वक्तव्य पूर्णपणे 'अतार्किक' असल्याचे म्हटले. त्यांनी सवाल केला की, "जर हिंदूंच्या बाबतीत दारूबंदी लादणे चुकीचे असेल, तर मग गुजरात आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये दारूबंदी कशी लागू करण्यात आली?"
वादानंतर स्वतःची चूक केली मान्य
या टीकेनंतर आणि वाढत्या वादानंतर उमर अब्दुल्ला यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी रविवारी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त करत, ते बोलणे चुकीचे असल्याचे मान्य केले आहे.