अरुणाचलच्या जंगलात ९,५०० फूट उंचीवर अग्नीतांडव; हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी विझवली आग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अरुणाचल प्रदेशातील लोहित खोऱ्यातील जंगलात लागलेली भीषण आग विझवण्यात भारतीय हवाई दलाला (IAF) मोठे यश आले आहे. या दुर्गम भागात पसरलेली आग आटोक्यात आणण्यासाठी हवाई दलाने एमआय-१७ व्ही ५ (Mi-17 V5) हेलिकॉप्टर्सचा वापर केला. या मोहिमेत तब्बल १२,००० लिटर पाण्याचा मारा करून ही आग नियंत्रणात आणण्यात आली. गुरुवारी ही मोहीम राबवण्यात आली.

समुद्रसपाटीपासून सुमारे ९,५०० फूट उंचीवर हा वणवा पेटला होता. इतक्या उंचीवर हवेची घनता अत्यंत कमी असते, त्यामुळे हेलिकॉप्टर उडवणे आणि आग विझवण्याचे काम करणे मोठे जिकिरीचे असते. तरीही हवाई दलाच्या वैमानिकांनी हे आव्हान स्वीकारत आगीवर पाण्याचे 'बंबी बकेट'द्वारे अचूक प्रक्षेपण केले.

भारतीय हवाई दलाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मोहिमेची माहिती दिली. "अरुणाचल प्रदेशातील लोहित खोऱ्यात ९,५०० फूट उंचीवर लागलेल्या आगीचा सामना करताना आमच्या एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टर्सनी १२,००० लिटर पाणी खाली टाकले. हिमालयातील विरळ हवेत ही मोहीम राबवून आमच्या जवानांनी अफाट धैर्य, अचूकता आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची कटिबद्धता सिद्ध केली आहे," असे हवाई दलाने आपल्या संदेशात म्हटले आहे.

निसर्गाचे आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी तसेच मानवी वस्तीला आगीपासून वाचवण्यासाठी हवाई दलाने तातडीने पावले उचलली. डोंगराळ भागात वेगाने पसरणाऱ्या आगीमुळे तिथल्या संवेदनशील परिसंस्थेला धोका निर्माण झाला होता. मात्र, हवाई दलाच्या या रॅपिड रिस्पॉन्समुळे मोठे नुकसान टळले आहे. गेल्या काही दिवसांत हवाई दलाने अशाच प्रकारे विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये तत्परतेने मदतकार्य केले आहे.