आसाममध्ये २४ लाख जण अडकले पुरात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

गुवाहाटी - आसामला अजूनही पुरापासून दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. राज्यातील जवळपास २४ लाख लोक पुराच्या पाण्यात अडकले असून ब्रह्मपुत्रेसह इतर अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. राज्यातील सुमारे २९ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून धुब्रीत सर्वाधिक आठ लाख जण पुराशी झुंज देत आहेत. त्याखालोखाल कच्छर आणि दरांग या जिल्ह्यांतही प्रत्येकी दीड लाखांहून लोक पुराचा सामना करत आहेत.

राज्यात पूरग्रस्तांसाठी ५७७ छावण्या उघडण्यात आल्या असून त्यात ५३ हजारांपेक्षा अधिक जणांनी आश्रय घेतला आहे. जोरहाट ते धुब्रीपर्यंत अनेक ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्याचप्रमाणे, दिसांग, कोपिली, बराक आदी नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचा कोंबड्यांसह इतर प्राण्यांनाही फटका बसला असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचप्रमाणे, रस्ते, पुलांसह पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे.

बिहारमध्येही जोरदार पाऊस
गेल्या २४ तासांत बिहारला जोरदार पावसाने झोडपले. त्यामुळे, कोसीसह महानंदा, गंडक, बागमती आदी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, असे जलसंपदा विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. या नद्यांनी काही ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली असून काही ठिकाणी या पातळीला स्पर्श केला आहे. सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जीवितहानीचे वृत्त नाही.

कर्नाटकमध्ये रेड अलर्ट जारी
बंगळूर - कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या डोंगराळ भागात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. शिमोगा जिल्ह्यातील होसनगर तालुक्यात ८ ते १० जुलैपर्यंत सर्व किनारी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter