नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा महिन्यात भारत स्वतःचे AI मॉडेल तयार करणार आहे. यामध्ये भारतीय सांस्कृतीक संदर्भ आणि भाषांचा समावेश असणार आहे.
AIच्या जगत सध्या अमेरिकेचे वर्चस्व आहे. या टक्कर देण्यासाठी चीनने त्यांचे डीपसीक (DeepSeek) हे मॉडेल तयार केले आहे. यामुळे ओपनएआय आणि जेमिनीसारख्या मोठ्या मॉडेल्सला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. AIच्या स्पर्धेत आता भारतानेही उडी घेतली आहे. भारतही याच दिशेने वाटचाल करत आहे आणि चॅटजीपीटीसारखा भारतीय एआय मॉडेल तयार करण्याची तयारी केली आहे.
भारताचे कंप्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत
भारत सरकारने एआय क्षेत्रात आपली ताकद दाखवण्याच्या दृष्टीने एक भक्कम कंप्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. भारताकडे सध्या १८,६०० उच्च कार्यक्षम ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) उपलब्ध आहेत. यामध्ये NVIDIA H100 आणि H200 युनिट्स, तसेच MI325 मॉडेल्सचा समावेश आहे. हे अत्याधुनिक उपकरणे भारताला आपल्या एआय मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती प्रदान करतील. उदाहरणार्थ, चीनच्या डीपसीक एआय मॉडेलला २,५०० GPUs आणि ओपनएआयच्या चॅटजीपीटीला २५,००० GPUs वर प्रशिक्षीत करण्यात आले होते, तर भारताच्या ताफ्यात १५,००० हाय-एंड GPUs आहेत.
‘इंडिया एआय मिशन’अंतर्गत, केंद्र सरकारने एआय स्टार्टअप्स, संशोधक आणि डेव्हलपर्ससाठी एकरूप संगणकीय सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून, १८,६०० GPUs उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि नव्या स्टार्टअप्सला कमी खर्चात अत्याधुनिक एआय साधनांचा उपयोग करता येईल. सध्या सरकारने १०,००० GPUs चालू केले आहेत. लवकर उर्वरित GPUs सुरू करून देण्यात येणार आहे. याविषयी बोलताना केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव म्हणाले, “या सुविधेमुळे तंत्रज्ञानाच्या वापरात सर्वांना समान संधी मिळेल. या सुविधेचा वापर ४०% सबसिडीवर केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि स्टार्टअप्सला कमी दरात उच्च दर्जाची संगणकीय संसाधने उपलब्ध होईल.”
भारताच्या एआय मॉडेल तयार करण्याचे काम सुरू आहे. आश्विनी वैष्णव म्हणतात, “सहा प्रमुख डेव्हलपर्सच्या टीम्स भारताचे AI मॉडेल विकसित करत आहे. ते पुढील ८ ते १० महिन्यांत भारताचे AI मॉडेल विकसित करतील.”
भारताच्या AIमॉडेलचे वैशिष्ट्य
भारताच्या AI मॉडेल विषयी बोलताना ते म्हणाले, “या AI मॉडेलमध्ये भारतीय भाषा, संस्कृती आणि त्यावरील आधारीत डेटाचा समावेश असेल.यामुळे देशाच्या विविधतेला प्रतिसाद दिला जाऊ शकतो. हे मॉडेल भारतीय नागरिकांसाठी, त्यांच्या आवश्यकतांसाठी आणि त्यांच्या जीवनशैलीसाठी अधिक प्रभावी असेल.”
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या AIमॉडेलसाठी ‘एलएलएम’ (लार्ज लँग्वेज मॉडेल) डेव्हलपमेंटसाठी प्रपोजल्स मागवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणतात, “भारताच्या AI मॉडेलमुळे जगातील अन्य देशांशी स्पर्धा करत भारत आपली तंत्रज्ञानातील ताकद सिद्ध करू शकतो. भारताचे उद्दीष्ट केवळ उच्च दर्जाचे मॉडेल तयार करणे नाही, तर AIतंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रांत करण्याचे आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter