संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) काश्मिरी महिलांच्या हक्कांवरून बिनबुडाचे आरोप करणाऱ्या पाकिस्तानला, भारताने त्यांच्याच इतिहासातील रक्तरंजित 'ऑपरेशन सर्चलाइट'ची आठवण करून देत सडेतोड उत्तर दिले आहे. "ज्यांनी स्वतः महिलांवर अमानुष अत्याचार केले आहेत, त्यांनी आम्हाला महिलांच्या हक्कांवर शहाणपण शिकवू नये," अशा शब्दांत भारताने पाकिस्तानचा ढोंगीपणा जगासमोर उघड केला.
जिनिव्हा येथे सुरू असलेल्या परिषदेत, पाकिस्तानी प्रतिनिधीने काश्मीरमधील महिलांच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत भारताविरुद्ध अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर देताना, भारतीय प्रतिनिधीने 'राईट ऑफ रिप्लाय'चा वापर करत पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराच्या चिंधड्या उडवल्या.
भारतीय प्रतिनिधीने १९७१ च्या युद्धाचा संदर्भ देत म्हटले की, "पाकिस्तानने 'ऑपरेशन सर्चलाइट' दरम्यान तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आताचा बांग्लादेश) काय केले होते, हे जग विसरलेले नाही. पाकिस्तानी लष्कराने लाखो लोकांची हत्या केली आणि हजारो महिलांवर बलात्कार केले होते. ज्यांचा स्वतःचा इतिहास इतका काळा आहे, त्यांना दुसऱ्यांवर बोट दाखवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही."
'ऑपरेशन सर्चलाइट'चा उल्लेख होताच पाकिस्तानी प्रतिनिधींची भंबेरी उडाली आणि ते निरुत्तर झाले. भारताच्या या आक्रमक आणि ठोस उत्तरामुळे, आंतरराष्ट्रीय मंचाचा गैरवापर करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा सुरुंग लागला आहे.