तालिबानचे मंत्री दिल्लीत! जयशंकर यांच्या भेटीनंतर भारत-अफगाणिस्तान व्यापाराला नवी दिशा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्यमंत्री अल्हाज नूरुद्दीन अझीझी
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्यमंत्री अल्हाज नूरुद्दीन अझीझी

 

भारताने गुरुवारी (२० नोव्हेंबर २०२५) अफगाणिस्तानच्या जनतेला आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार केला आणि दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी (संपर्क) व व्यापार वाढवण्याचे आश्वासन दिले. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अल्हाज नूरुद्दीन अझीझी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान हा संदेश दिला. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात हैदराबाद हाऊसमध्ये ज्यांचे आदरातिथ्य करण्यात आले, असे अझीझी हे दुसरे तालिबानी मंत्री ठरले आहेत.

बुधवारी पाच दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आलेले अझीझी आणि जयशंकर यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली. भेटीनंतर जयशंकर यांनी सांगितले, "आमचा व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर आम्ही चर्चा केली. अफगाणिस्तानच्या लोकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी भारताच्या पाठिंब्याचा मी पुनरुच्चार केला."

अझीझी यांनी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांचीही भेट घेतली. या चर्चेतून द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य बळकट करण्याची सामायिक वचनबद्धता दिसून आली, असे प्रसाद यांनी म्हटले.

अफगाणिस्तानच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अझीझी यांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यात इराणच्या चाबहार बंदराचा प्रभावी वापर करणे, नैऋत्य अफगाणिस्तानमधील निमरुझ प्रांतात ड्राय पोर्ट्स (Dry Ports) स्थापन करणे आणि मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून आयात-निर्यात प्रक्रिया सुलभ करणे, यांचा समावेश होता. तसेच, अफगाण व्यापाऱ्यांसाठी भारतीय व्हिसाची प्रक्रिया जलदगतीने करावी आणि अफगाणिस्तानमध्ये इंडस्ट्रियल पार्क्स (औद्योगिक वसाहती) उभारण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली.

अझीझी यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण ती अशा वेळी होत आहे, जेव्हा काबूलमधील तालिबान प्रशासनाने अफगाण व्यापाऱ्यांना पाकिस्तानसोबतचा व्यापार टाळण्याचे आणि व्यावसायिक कारणांसाठी कराची बंदराचा वापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. अझीझी एका मोठ्या व्यापारी शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी आपल्या पहिल्या बैठकी इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनमध्ये (ITPO) घेतल्या.

यापूर्वीच्या हमीद करझाई आणि अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात अफगाण मंत्री ITPO ला भेट देत असत. २०२१ मध्ये तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर, ITPO ला भेट देणारे अझीझी हे पहिलेच अफगाण मंत्री ठरले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारत भेटीदरम्यान विस्तार करण्यात आलेल्या भारत-अफगाणिस्तान एअर फ्रेट कॉरिडॉरला (हवाई मालवाहतूक मार्ग) लवकरच मूर्त स्वरूप दिले जाईल. हे काम अफगाण नागरी विमान वाहतूक कंपन्यांकडून केले जाईल. हा कॉरिडॉर अमृतसर, दिल्ली आणि मुंबईला कंदाहार आणि काबूलशी जोडणार आहे. मात्र, या हवाई मार्गाच्या सुरळीत कामकाजात पाकिस्तान अडथळे निर्माण करू शकतो, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.