पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) तिथल्या स्थानिक नागरिकांवर आणि आंदोलकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला जागतिक पातळीवर तीव्र शब्दांत सुनावले आहे. पाकिस्तानकडून होणारा हा छळ आणि मानवाधिकार उल्लंघन रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्लामाबादला जबाबदार धरावे, असे आवाहन भारताने केले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील विविध भागांत आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर तेथील पोलिसांनी केलेल्या हिंसक कारवाईत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर भारताने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली. पाकिस्तान स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आणि तिथल्या मानवाधिकार उल्लंघनावरून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सातत्याने केविलवाणे प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खोट्या व्हिडिओंचा सुळसुळाट
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी स्पष्ट केले की, पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती लपवण्यासाठी पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक खोट्या बातम्या आणि बनावट व्हिडिओ पसरवले जात आहेत.
हा पाकिस्तानचा एक पूर्वनियोजित पॅटर्न असून, तिथल्या जनतेचा आवाज दाबण्यासाठी आणि स्वतःचे प्रशासकीय अपयश झाकण्यासाठी या खोट्या प्रचार यंत्रणेचा वापर केला जात आहे. मात्र, तिथली भीषण परिस्थिती आता लपून राहिलेली नाही.
आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताचे आवाहन
पाकव्याप्त काश्मीरमधून समोर येत असलेल्या अहवालांनुसार, तिथल्या स्थानिक लोकांवर पोलिसांकडून अत्यंत क्रूरपणे बळाचा वापर केला जात आहे. या अमानुष कारवाईत अनेक निष्पाप आंदोलकांचा बळी गेला असून, शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत.
भारताने या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या या गैरकृत्यांची आणि नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय समुदायाने गंभीर दखल घेतली पाहिजे. जागतिक मंचावर पाकिस्तानच्या या कृत्यांचा जाब विचारला जावा आणि त्यांना या मानवाधिकार उल्लंघनासाठी पूर्णपणे जबाबदार धरले जावे, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.