भारत आणि अरब देशांमध्ये १० वर्षांनंतर होणार ऐतिहासिक बैठक!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारत आणि अरब देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. तब्बल १० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारत 'दुसऱ्या भारत-अरब मंत्रीस्तरीय बैठकीचे' यजमानपद भूषवणार आहे. ही ऐतिहासिक बैठक उद्या (शनिवारी, ३१ जानेवारी) नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवतील.

या महत्त्वाच्या परिषदेसाठी अरब लीगचे सरचिटणीस अहमद अबुल घैत नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच पॅलेस्टाईन, सुदान आणि कोमोरोस या देशांचे परराष्ट्र मंत्रीही भारतात आले आहेत. या उच्चस्तरीय बैठकीत अरब लीगच्या सर्व २२ सदस्य देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

१० वर्षांनंतरचा ऐतिहासिक क्षण 

यापूर्वी अशी पहिली मंत्रीस्तरीय बैठक २०१६ मध्ये बहरीनची राजधानी मनामा येथे झाली होती. त्यानंतर तब्बल एका दशकानंतर दोन्ही बाजूंनी संवादाचे हे पर्व पुन्हा सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारताने या बैठकीचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चर्चेचा अजेंडा काय? 

या बैठकीत व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा होईल. तसेच दहशतवादाचा सामना करणे, कट्टरतावाद रोखणे आणि सायबर सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवरही दोन्ही बाजूंनी भर दिला जाईल. पश्चिम आशियातील सध्याची अस्थिर परिस्थिती आणि गाझा मधील संघर्ष यावरही या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

भारतासाठी अरब जगताशी असलेले संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नाहीत, तर ते धोरणात्मकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत भारत मोठ्या प्रमाणावर आखाती देशांवर अवलंबून आहे. त्यामुळे या बैठकीतून दोन्ही बाजूंच्या संबंधांना एक नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.