शस्त्रसंधीचे भारताकडून स्वागत; भारतीयांचे कौतुक करताना इराणच्या प्रतिनिधींना अश्रू अनावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
डावीकडून इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
डावीकडून इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

 

नवी दिल्ली,

पश्चिम आशियात नुकत्याच लागू झालेल्या शस्त्रसंधीचे भारताने स्वागत केले आहे. या निर्णयातून तिथे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नुकतीच आपली अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडली.

सुरू असलेला हा संघर्ष लवकरात लवकर संपवणे गरजेचे आहे. त्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि मुत्सद्देगिरी हेच महत्त्वाचे मार्ग आहेत. भारताने सुरुवातीपासूनच या भूमिकेचा वारंवार पाठपुरावा केला आहे.

या युद्धामुळे सामान्य लोकांचे अतोनात हाल झाले आहेत. जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापाराचे जाळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भारताने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची मुक्त वाहतूक आणि जागतिक व्यापार विनाअडथळा सुरू राहील, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.

शांतता प्रस्थापित करण्यात भारताची मोलाची भूमिका

अमेरिका आणि इराणमधील संघर्षात भारताने बजावलेल्या भूमिकेबाबत इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी अत्यंत भावूक होत भारताचे तोंडभरून कौतुक केले.

डॉ. इलाही म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या राष्ट्राध्यक्षांसोबत तीन किंवा त्याहून अधिक वेळा अत्यंत यशस्वी चर्चा केली. हा संवाद खूप फलदायी ठरला. तसेच, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत अनेकदा अत्यंत सकारात्मक चर्चा केली."

भारतीयांचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. "भारतातील माझे भाऊ आणि बहिणी यांच्याबद्दल मी शब्दांत सांगू शकत नाही. जेव्हा जेव्हा मला त्यांची आठवण येते, तेव्हा मला रडू कोसळते. ते खूप उत्तम लोक आहेत. या चांगल्या माणसांचे मोल व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. इतकी सुंदर माणसे असल्याबद्दल मी भारतातील माझ्या सर्व बंधू-भगिनींचे मनापासून अभिनंदन करतो. ते खरोखरच विलक्षण लोक आहेत," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमेरिका आणि इराणची प्रतिक्रिया 

गेल्या काही काळापासून इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरू होता. या युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण होते. अखेर अनेक प्रयत्नांनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला होकार दिला आहे. यामुळे जगावर आलेले युद्धाचे काळे ढग सध्या तरी विरले आहेत.

या घडामोडीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपला विश्वास व्यक्त केला आहे.

ट्रम्प म्हणतात, "जागतिक शांततेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे! इराणलाही आता हेच हवे आहे, कारण ते देखील आता खूप कंटाळले आहेत. आणि बाकी सर्वांचीही तीच अवस्था आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे."

त्यांनी पुढे लिहिले आहे, "तिथे अनेक सकारात्मक घडामोडी पाहायला मिळतील! प्रचंड आर्थिक उलाढाल होईल. इराण आता पुनर्बांधणीच्या प्रक्रियेला सुरुवात करू शकतो. आम्ही सर्व प्रकारच्या साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी सज्ज आहोत. सर्व काही सुरळीत पार पडावे यासाठी आम्ही तिथे लक्ष ठेवून असणार आहोत."

या कराराच्या यशाबद्दल त्यांनी खात्री व्यक्त केली. "हे नक्की यशस्वी होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. जसा सुवर्णकाळ सध्या अमेरिका अनुभवत आहे, तसाच हा मध्यपूर्वेचा सुवर्णकाळ ठरू शकतो!!!" असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये ठामपणे नमूद केले आहे.

दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी ७ एप्रिल रोजी तेहरानमधून देशाची अधिकृत भूमिका जाहीर केली. या युद्धविरामासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानच्या नेत्यांचे आभार मानले.

अमेरिकेने त्यांच्या १५ कलमी प्रस्तावावर चर्चेची विनंती केली आहे. तसेच, ट्रम्प यांनी इराणच्या १० कलमी प्रस्तावाचा मुख्य आराखडा चर्चेसाठी मान्य केला आहे. याची दखल घेत इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने अरागची यांनी ही शस्त्रसंधीची घोषणा केली.

अरागची म्हणाले, "जर इराणवरील हल्ले थांबले, तर आमचे सशस्त्र दल आपली बचावात्मक कारवाई त्वरित थांबवतील. तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन आणि इराणच्या लष्कराशी समन्वय साधून, येत्या दोन आठवड्यांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल."

संयुक्त राष्ट्रांकडून शस्त्रसंधीचे स्वागत

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सरचिटणीसांच्या प्रवक्त्यानेही या शस्त्रसंधीवर निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिका आणि इराणने जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचे सरचिटणीसांनी स्वागत केले आहे.

या युद्धात सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. तसेच, त्यांनी शस्त्रसंधीच्या अटींचे काटेकोरपणे पालन करावे. यातूनच या भागात कायमस्वरूपी आणि संपूर्ण शांततेचा मार्ग मोकळा होऊ शकेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सामान्य लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि मानवी हालअपेष्टा कमी करण्यासाठी हा संघर्ष तातडीने थांबवणे अत्यंत गरजेचे आहे. यावर सरचिटणीसांनी विशेष भर दिला आहे. ही शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी मध्यस्थांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter