थंड पाण्यापेक्षा गरम पाणी लवकर गोठते, हे विज्ञानातील एक मोठे कोडे मानले जाते. याला तांत्रिक भाषेत 'एमपेम्बा इफेक्ट' (Mpemba effect) असे म्हणतात. अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांना सतावत असलेल्या या प्रश्नाचे उत्तर आता भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. भारतीय संशोधकांनी सुपरकॉम्प्युटरच्या मदतीने जगातील पहिले सिम्युलेशन तयार केले असून, त्याद्वारे हा परिणाम प्रत्यक्ष कसा घडतो, हे सिद्ध केले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू येथील 'जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च' (JNCASR) च्या संशोधकांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. बर्फ तयार होण्याची प्रक्रिया त्यांनी सुपरकॉम्प्युटरवर सिम्युलेशनद्वारे मांडली असून, त्यातून एमपेम्बा इफेक्टचे अस्तित्व सिद्ध झाले आहे.
या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा परिणाम केवळ पाण्यापुरता मर्यादित नाही. जेव्हा एखादा द्रव पदार्थ स्थायू रूपात रूपांतरित होतो, तेव्हा त्या इतर प्रणालींमध्येही असाच परिणाम दिसून येऊ शकतो, हे या सिम्युलेशनमधून स्पष्ट झाले आहे. विज्ञानातील या अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेला मॉडेलच्या स्वरूपात मांडण्यात भारतीय शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश आले आहे.
हे संशोधन 'जर्नल ऑफ कम्युनिकेशन फिजिक्स'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भविष्यात पदार्थांच्या गोठण्याच्या प्रक्रियेचा अधिक सखोल अभ्यास करणे शक्य होणार आहे. विज्ञानातील एक दीर्घकालीन रहस्य उलगडल्यामुळे जागतिक वैज्ञानिक स्तरावर भारतीय संशोधनाचे मोठे कौतुक होत आहे.