अहमदाबाद
भारताची निवडणूक प्रक्रिया ही जगातील सर्वात पारदर्शक प्रक्रियांपैकी एक असून, मतदार यादीपासून ते मतमोजणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काटेकोर पडताळणी केली जाती, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाच्या अटल कलाम हॉलमध्ये आयोजित 'बुथ लेव्हल ऑफिसरसोबत संवाद' कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी सतत पडताळणी करत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
मतदार याद्यांमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांच्या बुथ लेव्हल एजंट्सचा (BLA) सक्रिय सहभाग असतो. अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची ओळख पटवून पात्र मतदारांची नावे यादीत कायम राखण्याची जबाबदारी बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) पार पाडतात, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक पात्र भारतीय नागरिकाचे नाव मतदार yaदीत समाविष्ट केले पाहिजे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या पोलिंग एजंट्सच्या उपस्थितीत मॉक पोलद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी केली जाते. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम निकालाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. तसेच मतमोजणीदरम्यान ईव्हीएममधील मतांची नोंद उमेदवारांच्या काऊंटिंग एजंट्ससमक्ष फॉर्म १७ सी मधील मतांशी पडताळली जाते.
मतदार याद्यांची शुद्धता आणि अचूकता राखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision) मोहीम राबवली जाते. बीएलओ थेट मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करतात. तरुणांमध्ये लोकशाही जाणिवा रुजवण्यासाठी अहमदाबाद येथे आयोजित 'इलेक्टोरल लिटरेसी क्लब्स अँड इमिनेट' या पाचव्या प्रादेशिक परिषदेतही त्यांनी सहभाग घेतला.
भारत सध्या ३५ प्रमुख लोकशाही देशांचा समावेश असलेल्या 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स' (International IDEA) चे अध्यक्षपद भूषवत आहे. भारतीय निवडणूक प्रणालीच्या मुक्त आणि निष्पक्ष स्वरूपाची ही जागतिक मान्यता असल्याचे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.