मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दूषित पाण्यामुळे पसरलेल्या साथीने गंभीर रूप धारण केले आहे. या घटनेत आतापर्यंत अनेकांना बाधा झाली असून अजूनही २०० नागरिक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील ३२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून इंदूर महानगरपालिकेचे आयुक्त शिवम वर्मा यांची तडकाफडकी पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याने प्रशासनावर चौफेर टीका होत होती. या निष्काळजीपणाला जबाबदार धरत राज्य शासनाने कठोर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त शिवम वर्मा यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हाधिकारी आशिष सिंह यांच्याकडे महानगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. यासोबतच पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संजीव श्रीवास्तव आणि संबंधित झोनल अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.
शहरातील स्नेहलतागंज आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. हे पाणी प्यायल्याने शेकडो नागरिकांना उलटी, जुलाब आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या समस्येने काही तासांतच भीषण रूप धारण केले. रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली असून आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांचे विशेष पथक रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रशासनाने आता संबंधित भागातील पाणीपुरवठा लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. बाधित भागात टँकरद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.