नौदलाच्या ताफ्यात मालवण युद्धनौकेची एन्ट्री! छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाचा सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय नौदलाला मंगळवारी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली मालवण ही दुसरी अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW SWC) युद्धनौका सुपूर्द केली. याच दिवशी गोवा शिपयार्डमध्ये तयार करण्यात आलेल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसलचे (NOPV) देखील जलावतरण करण्यात आले. 

आयएनएस मालवण (INS Malwan) हे नाव महाराष्ट्रातील मालवण या किनारपट्टीवरील शहरावरून देण्यात आले आहे. हा भाग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान सागरी वारशाशी जोडलेला आहे. तसेच हे नाव २००३ पर्यंत सेवेत असलेल्या आयएनएस मालवण या माईनस्वीपर युद्धनौकेचा वारसा पुढे चालवते. प्रतिष्ठित युद्धनौकांची नावे जतन करण्याच्या नौदलाच्या परंपरेनुसार हे नाव कायम ठेवण्यात आले आहे.

८० मीटर लांब आणि १,१०० टन वजनाची ही युद्धनौका पाण्याखालील पाळत ठेवणे, किनारपट्टीवरील पाणबुडीविरोधी कारवाया, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि सुरुंग युद्धासाठी सज्ज आहे. दुसरीकडे, गोवा शिपयार्डमध्ये ११ नवीन पिढीच्या ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्सपैकी शुची (यार्ड १२८०) या पहिल्या जहाजाचे जलावतरण झाले. हे जहाज संरक्षण, पाळत ठेवणे, शोध आणि बचाव कार्य, सागरी मालमत्तेचे संरक्षण, आपत्ती निवारण आणि चाचेगिरी रोखण्यासाठी सध्याच्या १० गस्ती जहाजांच्या ताफ्यात सामील होऊन नौदलाची ताकद वाढवेल.