मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये भारत, रशिया, चीन, पाकिस्तान आणि इराक या पाच मित्र राष्ट्रांच्या जहाजांवर कोणतीही बंदी घातली जाणार नाही. संघर्षाने ग्रासलेल्या या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून या देशांच्या जहाजांना सुरक्षित प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणच्या सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. ज्या देशांशी इराणचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, अशा अनेक राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची मुभा आहे.
रॉयटर्सने सरकारी टीव्हीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अराघची म्हणाले, "अनेक जहाज मालकांनी किंवा संबंधित देशांनी आमच्याशी संपर्क साधून या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाची खात्री देण्याची विनंती केली होती. ज्या देशांना आम्ही आमचे मित्र मानतो किंवा इतर कारणांमुळे ज्यांच्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे, अशा देशांच्या जहाजांना आमच्या सशस्त्र दलांनी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे."
ते पुढे म्हणाले, "चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि भारत या देशांबाबतच्या बातम्या तुम्ही पाहिल्याच असतील. दोन रात्रींपूर्वीच भारताची दोन जहाजे या मार्गावरून गेली आहेत. याशिवाय बांगलादेश आणि इतर काही देशांचाही यात समावेश आहे. या देशांनी आमच्याशी संवाद साधला आणि समन्वय राखला असून ही प्रक्रिया भविष्यात आणि युद्धानंतरही सुरू राहील."
मात्र, अमेरिका, इस्रायल आणि मध्यपूर्वेतील संघर्षात भूमिका बजावणाऱ्या आखाती देशांच्या जहाजांना या युद्धजन्य क्षेत्रातून प्रवासासाठी कोणताही हिरवा कंदील दिला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 'शत्रू राष्ट्रांच्या' जहाजांविषयी बोलताना अराघची म्हणाले, "आम्ही सध्या युद्धाच्या परिस्थितीत आहोत. हा संपूर्ण प्रदेश युद्धभूमी बनला आहे. त्यामुळे आमच्या शत्रूंच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना इथून जाऊ देण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु, इतरांसाठी हा मार्ग उघडाच राहील."
जवळपास पाच दशकांनंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने मिळवलेल्या वर्चस्वाबद्दल अराघची यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, जेव्हा इराणने या मार्गावर अंशतः बंदी घालण्याची घोषणा केली होती, तेव्हा जगातील अनेकांना तो केवळ एक बनाव वाटला होता. मात्र, काळानुसार इराणने आपली ताकद आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपला अधिकार जगाला दाखवून दिला आहे.
अराघची यांनी नमूद केले की, "इराणमध्ये असे धाडस करण्याची हिंमत नाही, असे त्यांना वाटत होते. पण आम्ही हे पूर्ण ताकदीने करून दाखवले. त्यांनी हे रोखण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली, पण ते अपयशी ठरले. त्यांनी इतर देशांकडे मदत मागितली, अगदी त्यांच्या शत्रूंकडेही हा जलमार्ग पुन्हा उघडण्यासाठी साकडे घातले. पण कोणीही प्रतिसाद दिला नाही, कारण हे करणे इतके सोपे नाही."
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर काही दिवसांतच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने हॉर्मुझची सामुद्रधुनी अंशतः बंद करण्याची घोषणा केली होती.
बीबीसीच्या अहवालानुसार, हा जलमार्ग जगातील सर्वात व्यस्त तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जगातील सुमारे २०% तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक याच मार्गाने होते. या मार्गावरील बंदीमुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले. कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली असून अनेक देशांना याचा फटका बसला आहे.
या सागरी अडथळ्यामुळे भारतात 'लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस'चा (एलपीजी) तुटवडा निर्माण झाला. कारण भारत आपल्या एकूण एलपीजी आयातीपैकी जवळपास ९०% आयात याच सामुद्रधुनीतून करतो. या टंचाईचा फटका रस्त्यावरील छोट्या विक्रेत्यांपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत मोठ्या जनसमुदायाला बसला आहे.