जम्मू आणि काश्मीर सरकारने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ५६ व्यक्तींना राज्य पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना हौतात्म्य पत्करणाऱ्या आदिल हुसैन शाह यांना मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे आयुक्त सचिव एम. राजू यांनी रविवारी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.
पहलगामच्या हपतणार गावातील रहिवासी असलेल्या आदिल यांनी २२ एप्रिल रोजी बैसारन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा धैर्याने सामना केला होता. या हल्ल्यात २५ पर्यटकांसह त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या या अदम्य साहसासाठी त्यांना १ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन मरणोत्तर गौरवण्यात आले आहे. तसेच गंग्याल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल कुमार यांनाही या श्रेणीत ५१ हजार रुपयांचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.
पत्रकारिता क्षेत्रात पीटीआयचे (PTI) श्रीनगर ब्युरो चीफ इनायत जहांगीर आणि जम्मूचे व्हिडिओ पत्रकार सोमिल अबरोल यांच्यासह १२ जणांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये अवतार कृष्ण भट, विवेक सुरी, रजिया नूर आणि नीता शर्मा यांचाही समावेश आहे. साहित्य क्षेत्रात डोगरी साहित्यिक यशपाल निर्मल, चौधरी हसन परवाझ आणि कवी फयाज दिलबर (मरणोत्तर) यांच्यासह ६ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
प्रशासकीय क्षेत्रात माजी आयएएस अधिकारी मोहम्मद शफी पंडित यांना मरणोत्तर 'जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला आहे. उत्कृष्ट सार्वजनिक सेवेसाठी मुख्य वनसंरक्षक व्ही.एस. सेंथिल कुमार, व्यवस्थापकीय संचालक तारिक गनी आणि डॉ. माजिद जहांगीर यांचा सन्मान करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रात क्रिकेटपटू आकिब नबी डार आणि ब्रिजेश शर्मा यांच्यासह ज्युडोपटू विशाल खजुरीया आणि स्केटिंगपटू आयझा नाझ चिब यांना पुरस्कार मिळाले आहेत. कला क्षेत्रात गायक तान्या देव गुप्ता, अभिनेता अनिल टिकू आणि रबाब वादक अब्दुल हमीद भट यांना गौरवण्यात आले आहे. समाजसुधारणेसाठी 'क्यारी' चे संस्थापक अर्णव बागती, 'केअर फाउंडेशन'च्या मेहजबीन नबी आणि 'टीम रेड'चे सादत नासिर वानी सोगमी यांचा सन्मान झाला आहे.