जम्मू-काश्मीर : कलम ३७० हटवल्यानंतर खोऱ्यातील पर्यटनाने गाठला नवा उच्चांक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 11 h ago
गेल्या वर्षभरात तब्बल १.७ कोटींहून अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्याला भेट दिली
गेल्या वर्षभरात तब्बल १.७ कोटींहून अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्याला भेट दिली

 

श्रीनगर:

जम्मू-काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्राने २०२५ मध्ये यशाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात तब्बल १.७ कोटींहून अधिक पर्यटकांनी जम्मू-काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्याला भेट दिली. विशेष म्हणजे, यामध्ये ३६,००० हून अधिक परदेशी पर्यटकांचा समावेश असून, दशकांनंतर खोऱ्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची इतकी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्यानंतर आणि केंद्रशासित प्रदेशात शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि दाल लेक यांसारख्या पारंपरिक पर्यटन स्थळांसोबतच आता दूधपथरी आणि गुरेझ व्हॅली यांसारख्या नवीन आणि दुर्गम ठिकाणांकडेही पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

पर्यटन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या यशावर बोलताना सांगितले की, "हे आकडे केवळ पर्यटकांच्या संख्येपुरते मर्यादित नाहीत, तर ते जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या बदलाचे प्रतीक आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल व्यावसायिक, हाऊसकोट चालक, टॅक्सी ड्रायव्हर आणि हस्तकला कारागीर अशा हजारो कुटुंबांच्या आयुष्यात सुख समृद्धी आली आहे. विशेषतः परदेशी पर्यटकांचा वाढलेला ओढा पाहता, आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरची प्रतिमा एक 'सुरक्षित पर्यटन स्थळ' म्हणून अधिक मजबूत झाली आहे."

स्थानिक नागरिकांमध्येही या बदलामुळे समाधानाचे वातावरण आहे. श्रीनगरमधील एका हाऊसकोट चालकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "अनेक वर्षांनंतर आमचे सर्व हाऊसकोट पूर्ण वर्षभर पर्यटकांनी भरलेले पाहायला मिळत आहेत. परदेशी पर्यटक जेव्हा इथल्या संस्कृतीचं आणि आदरातिथ्याचं कौतुक करतात, तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. आता आम्हाला पुन्हा एकदा त्या सुवर्णकाळाची आठवण होत आहे, जेव्हा जगभरातून लोक काश्मीरला 'पृथ्वीवरील नंदनवन' पाहायला येत असत."

जी-२० शिखर परिषदेच्या बैठकीनंतर काश्मीरमधील पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा आणि जागतिक स्तरावर झालेली प्रसिद्धी यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारने पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी सीमावर्ती भागातील पर्यटनावरही (Border Tourism) विशेष भर दिला असून, येणाऱ्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.