“हिंदू-मुस्लिम एकता हा शब्दच चुकीचा, कारण…” - सरसंघचालक

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 12 h ago
'१०० इयर्स ऑफ संघ जर्नी - न्यू होरायझन्स' या व्याख्यानमालेत बोलताना मोहन भागवत
'१०० इयर्स ऑफ संघ जर्नी - न्यू होरायझन्स' या व्याख्यानमालेत बोलताना मोहन भागवत

 

आवाज द व्हॉइस, मुंबई 

"भारतात राहणारा प्रत्येक नागरिक, मग त्याची प्रार्थना करण्याची पद्धत कोणतीही असो, तो संस्कृती आणि राष्ट्राने एकच आहे. त्यामुळे 'हिंदू-मुस्लिम एकता' हा शब्दप्रयोगच तांत्रिकदृष्ट्या चुकीचा वाटतो, कारण तुम्ही दोन वेगळ्या लोकांना एकत्र आणता, पण जे आधीपासूनच एक आहेत त्यांना वेगळं कसं मानता येईल?" असे महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक भाष्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे आयोजित '१०० इयर्स ऑफ संघ जर्नी - न्यू होरायझन्स' या व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी १९४७ ची फाळणी, भारतीय संविधान आणि मुस्लिम समाजासोबतचा संवाद यावर सविस्तर प्रकाश टाकला.

संविधान: प्राचीन धर्माचे आधुनिक रूप

डॉ. भागवत यांनी सांगितले की, भारताने १९४७ च्या फाळणीनंतर स्वतःला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याऐवजी सर्वसमावेशक संविधान स्वीकारले, हे इथल्या 'हिंदू भावाचे' (हिंदू मानसिकतेचे) यश आहे. "आपले संविधान म्हणजे एका अर्थाने आपल्या प्राचीन 'धर्माचे' (कर्तव्य आणि नैतिकतेचे) आधुनिक स्वरूप आहे. 'वसुधैव कुटुंबकम' (संपूर्ण जग हेच एक कुटुंब) या हिंदू संस्कारामुळेच भारताने सर्वांना समान हक्क देणारी लोकशाही स्वीकारली," असे त्यांनी नमूद केले.

फाळणीची वेदना आणि हिंदू भाव

१९४७ च्या फाळणीवर भाष्य करताना ते म्हणाले की, "जेव्हा आपण आपला 'हिंदू भाव' विसरलो, तेव्हाच देशाची फाळणी झाली. मात्र, फाळणीनंतर पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केले, पण भारताने मात्र 'सर्वांसाठीचे राष्ट्र' (Nation for All) राहण्याचा निर्णय घेतला. आजही भारतात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म सुरक्षित आहेत, कारण इथला बहुसंख्य समाज कोणाच्याही श्रद्धेचा अनादर करत नाही."

मुस्लिम समाजाशी संवादाचे आवाहन

सरसंघचालकांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाशी थेट संवादाची गरज व्यक्त केली. भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे पूर्वज हिंदूच होते आणि त्यांची संस्कृती आजही भारतीयच आहे.

"हिंदुत्व स्वीकारणे म्हणजे आपली प्रार्थना पद्धत किंवा भाषा बदलणे नव्हे. उलट हिंदुत्व हे तुमच्या सुरक्षिततेची आणि विविधतेची हमी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

काही वेळा धोरणांवरून किंवा प्रतिक्रियांमधून संघर्ष होतात, पण समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना संवादातून उत्तर देणे आवश्यक आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. 

'स्वदेशी' आणि स्वावलंबनाचा मंत्र

आपल्या भाषणात त्यांनी 'स्वदेशी' विचार केवळ वस्तूंच्या खरेदीपुरता मर्यादित न ठेवता तो जगण्याच्या पद्धतीत आणण्याचे आवाहन केले. भाषा, भूषा (पोशाख), भ्रमण (पर्यटन), भोजन आणि भवन (घर) या पाच स्तरांवर भारतीयत्वाचा अभिमान बाळगायला हवा, असे ते म्हणाले.

सरसंघचालकांनी भाषणात केला सलमान खानचा उल्लेख 

मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी व्याख्यानमालेत एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. एका बाजूला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत देशाच्या भविष्यावर आणि संस्कृतीवर भाष्य करत होते, तर दुसरीकडे बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हे भाषण अत्यंत बारकाईने ऐकत होता. आपल्या भाषणादरम्यान डॉ. भागवत यांनी थेट सलमान खानचे नाव घेत समाजातील फॅशन आणि आदर्शांवर भाष्य केले.

समाजातील बदलांवर बोलताना डॉ. भागवत म्हणाले, "आजचा समाज हा फॅशननुसार चालतो. महाविद्यालयीन तरुणांना पहा, चित्रपटात सलमान खानजी जसे कपडे घालतात, तसेच कपडे हे तरुणही घालतात. त्यांना विचारलं की असे कपडे का घातलेत? तर त्यांना त्याचं कारण माहीत नसतं. ते फक्त इतकंच म्हणतात की, 'सलमान खानने घातलेत, म्हणून आम्ही घातलेत'."


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter