पोलीस अधिकाऱ्याच्या खांद्यावर स्वार होऊन 'नदीम'ने पाहिलं स्वतःचं स्वप्न!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह हे नदीमला पोलीस स्टेशन दाखवताना
पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह हे नदीमला पोलीस स्टेशन दाखवताना

 

समाजात पोलिसांची प्रतिमा सहसा कडक शिस्तीची आणि धाक निर्माण करणारी असते. परंतु राजस्थानमधील डीडवाना येथे घडलेल्या एका घटनेने हे सिद्ध केले आहे की, खाकी वर्दीच्या मागेही एक अत्यंत संवेदनशील मन असते. पोलिस अधिकारी राजेंद्र सिंह यांनी दाखवलेल्या या औदार्यामुळे एका दिव्यांग तरुणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच संपूर्ण पोलीस प्रशासनाची मान देखील अभिमानाने उंचावली आहे.

एका भेटीत इच्छापूर्ती

बलिया गावचा रहिवासी असलेला ३० वर्षीय नदीम हा तरुण जन्मापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. निसर्गाने त्याला हात आणि पाय दिलेले नाहीत, तरीही त्याच्या मनातील जिद्द आणि कुतूहल कमी झालेले नाही. एके दिवशी पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गस्तीवर असताना नदीमची आणि त्यांची भेट झाली. त्यावेळी गप्पांच्या ओघात नदीमने आपली एक निरागस इच्छा बोलून दाखवली. तो त्यांना म्हणाला, "मला पोलीस स्टेशन कसं असतं ते पाहायचं आहे."

खांद्यावरून पोलीस स्टेशनची वारी

एका अधिकाऱ्याला अशा प्रकारे भेटणे आणि आपली इच्छा सांगणे हे नदीमसाठी सोपे नव्हते. परंतु राजेंद्र सिंह यांनी नदीमची विनंती ऐकताच क्षणात स्वीकारली. त्यांनी नदीमला पोलीस स्टेशनला येण्याचे निमंत्रण दिले. जेव्हा नदीम तिथे पोहोचला, तेव्हा राजेंद्र सिंह यांनी कोणताही संकोच न बाळगता त्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतले.

त्यांनी नदीमला पोलीस ठाण्यातील प्रत्येक विभाग फिरवून दाखवला. गुन्हेगारांना जिथे ठेवले जाते ती कोठडी असो किंवा महत्त्वाचे दस्तऐवज असणारी रेकॉर्ड रूम, राजेंद्र सिंह यांनी प्रत्येक गोष्टीची माहिती नदीमला एखाद्या मित्राप्रमाणे दिली. या संस्मरणीय भेटीचा कळस म्हणजे, राजेंद्र सिंह यांनी आपली मानाची पोलीस टोपी नदीमच्या डोक्यावर ठेवली. त्या क्षणी नदीमच्या चेहऱ्यावर जे हसू उमलले आणि त्याच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू आले, त्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे मन हेलावून सोडले.

माणुसकी सर्वात आधी!

या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, नेटिझन्सकडून राजेंद्र सिंह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या घटनेवर बोलताना राजेंद्र सिंह अत्यंत विनम्रपणे म्हणतात, "पोलीस म्हणजे केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणारे यंत्र नाही, तर ती समाजाची सेवा करणारी एक शक्ती आहे. जेव्हा नदीमने त्याची इच्छा सांगितली, तेव्हा एक माणूस म्हणून त्याला मदत करणे ही माझी जबाबदारी होती. माझ्यासाठी माणुसकी नेहमीच कायद्याच्या पुस्तकापेक्षा मोठी असेल."

विश्वासाचे नवे नाते

स्थानिक नागरिकांच्या मते, अशा घटनांमुळे पोलीस आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होते. वर्दीचा धाक गुन्हेगारांमध्ये असावा, पण सर्वसामान्यांसाठी ती मदतीचा आधार वाटली पाहिजे, हा संदेश डीडवानाच्या या अधिकाऱ्याने आपल्या कृतीतून दिला आहे.

आज सोशल मीडियाच्या जगात जिथे अनेक नकारात्मक बातम्यांचा पाऊस असतो, तिथे राजेंद्र सिंह आणि नदीम यांची ही 'खांद्यावरची वारी' माणुसकी अजूनही जिवंत असल्याची साक्ष देत आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter