बांगलादेशात निवडणुकीपूर्वी कट्टरपंथीयांमध्ये यादवी; हिफाजत-ए-इस्लामचा जमात-ए-इस्लामी विरुद्ध 'जिहाद'!

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 11 h ago
बांगलादेशातील निवडणूक प्रचारातील दृश्य
बांगलादेशातील निवडणूक प्रचारातील दृश्य

 

ढाका:

बांगलादेशातील १२ फेब्रुवारीच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असतानाच तिथल्या राजकीय आणि धार्मिक वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशातील सर्वात प्रभावशाली कट्टरपंथी संघटना मानल्या जाणाऱ्या 'हिफाजत-ए-इस्लाम'ने दुसरी कट्टरपंथी संघटना 'जमात-ए-इस्लामी' विरुद्ध चक्क 'जिहाद' पुकारला आहे. इतकेच नाही तर, या निवडणुकीत मतदान करणे हे इस्लाममध्ये 'हराम' (निषिद्ध) असल्याचे सांगून त्यांनी आपल्या अनुयायांना मतदानापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

हिफाजत-ए-इस्लामच्या या भूमिकेमुळे बांगलादेशातील निवडणुकांमध्ये आता धर्माचा मोठा प्रभाव पाहायला मिळत असून, यामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

जमात-ए-इस्लामीवर 'इस्लामविरोधी' असल्याचा शिक्का

हिफाजत-ए-इस्लामच्या नेत्यांनी एका जाहीर सभेत आरोप केला की, जमात-ए-इस्लामी ही संघटना इस्लामच्या नावाखाली राजकारण करत असून त्यांचे विचार मूळ इस्लामिक शिकवणुकीशी सुसंगत नाहीत. हिफाजतने जमातला 'भ्रष्ट' ठरवून त्यांच्या विरोधात उभे राहणे हाच खरा जिहाद असल्याचे म्हटले आहे. दोन कट्टरपंथी संघटनांमधील हा उघड संघर्ष बांगलादेशातील धार्मिक मतांचे विभाजन करणारा ठरू शकतो.

मतदान 'हराम' आणि बीएनपीला झुकते माप

एकीकडे मतदानाला 'हराम' म्हणत असतानाच, हिफाजत-ए-इस्लामने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि त्यांच्या मित्रपक्षांना आपले समर्थन जाहीर केले आहे. सद्यस्थितीत असलेल्या राजकीय व्यवस्थेला विरोध करण्यासाठी आणि स्वतःचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी हिफाजतने ही खेळी खेळल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, मतदान न करण्याचे आवाहन केल्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

भारतासाठी चिंतेचा विषय

शेजारील देशात कट्टरपंथी संघटनांमध्ये सुरू झालेली ही यादवी भारतासाठीही संवेदनशील आहे. बांगलादेशातील निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण वाढल्यास त्याचा परिणाम तिथल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या सुरक्षेवर आणि सीमावर्ती भागातील शांततेवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत या दोन्ही संघटनांचा इतिहास पाहता, भारतीय सुरक्षा यंत्रणा या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान

हिफाजत-ए-इस्लामच्या या फतव्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाने शांततेत मतदान पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची नियुक्ती केली आहे. तरीही, धार्मिक नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या अशा चिथावणीखोर इशाऱ्यांमुळे १२ फेब्रुवारीला बांगलादेशात लोकशाहीचा विजय होतो की कट्टरतावादाचा, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.