अफगाणिस्तानची आयातीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मोठ्या दबावाखाली आली आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्यात सातत्याने घसरण होत असली तरी जीवनावश्यक अन्नपदार्थांच्या किमती मात्र वाढतच आहेत. गेल्या सुमारे सात महिन्यांत स्थानिक बाजारपेठेत डॉलर कमकुवत झाला असून सध्या एक डॉलरचा दर साधारण ६५ अफगाणी इतका आहे. मात्र, चलन मजबूत होऊनही पीठ, तांदूळ आणि खाद्यतेलासारख्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत.
टोलो न्यूजने मिळवलेल्या आकडेवारीचा दाखला देत या अहवालात म्हटले आहे की, विनिमय दरात घट झाली असली तरी मुख्य वस्तूंच्या किमती १०० अफगाणीपासून १००० अफगाणीहून अधिक वाढल्या आहेत. हारून नावाच्या एका दुकानदाराने सांगितले की, "या परिस्थितीचा खूप मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी जे लोक एक शेर (स्थानिक माप) वस्तू खरेदी करायचे, ते आता फक्त एक किलो खरेदी करत आहेत. लोकांना या किमती परवडत नाहीत. किमती वाढल्या की विक्री आपोआप कमी होते."
दुसरीकडे, टोलो न्यूजच्या वृत्तानुसार 'दा अफगाणिस्तान बँक'ने दावा केला आहे की, चोख आर्थिक व्यवस्थापनामुळे अफगाणी हे या भागातील सर्वात स्थिर चलनांपैकी एक राहिले आहे. सेंट्रल बँकेचे प्रवक्ते हसीबुल्लाह नूरी म्हणाले, "विवेकपूर्ण आणि संतुलित आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करून, निर्यात वाढवून, पारदर्शकता आणून, अंमली पदार्थांची तस्करी रोखून आणि अफगाणी चलनाचा वापर वाढवून सेंट्रल बँकेने राष्ट्रीय चलनाची स्थिरता मजबूत करण्यास मदत केली आहे."
बँकेने दिलेली ही आश्वासने कागदावर असली तरी वाढत्या किमतींमुळे गरीब कुटुंबांवर ताण वाढला असून त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. काबुलचे रहिवासी रझ मोहम्मद यांनी सांगितले की, "किमती खूप वाढल्या असून गरिबांना त्या परवडणाऱ्या नाहीत. एक गरीब माणूस तांदूळ किंवा खाद्यतेल विकत घेऊ शकत नाही." फहीम नावाच्या दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले की, "किमतींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी झाली असून आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे."
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्व्हेस्टमेंटने यावर आपली भूमिका मांडली आहे. किमती वाढण्यामागे केवळ चलनातील चढ-उतार हे एकमेव कारण नसून बाजार स्थिर करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्व्हेस्टमेंटचे कार्यवाहक प्रमुख मोहम्मद वली अमिनी म्हणाले, "खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून चेंबर ऑफ कॉमर्स अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गंभीर प्रयत्न करत आहे. या वस्तू सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून सरकारच्या सहकार्याने किमती नियंत्रित करण्यासाठी आम्ही व्यापक प्रयत्न सुरू ठेवू." असे असले तरी, सातत्याने होणारी आयात आणि वाहतुकीमधील अडथळ्यांचा फटका रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांना बसत असल्याचे टोलो न्यूजने म्हटले आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत सामान्य जीवन जगणेही कठीण होत चालले आहे.