नुकताच पाकिस्तानात एक असा हल्ला झाला ज्याने संपूर्ण देश हादरला आहे. 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' या बंदी घातलेल्या संघटनेने एकापाठोपाठ एक अनेक हिंसक हल्ले केले. लष्करी ठिकाणं, सरकारी मालमत्ता आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करत केलेल्या या हल्ल्यात १५ सुरक्षा रक्षक आणि १८ नागरिक ठार झाले.
या हल्ल्याचा जगभरातून निषेध झाला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी लष्कराने कारवाई करत जवळपास १४४ बंडखोरांना कंठस्नान घातले. हा गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठा आकडा आहे.
पाकिस्ताची चोर सोडून संन्यासाला फाशी अशी जुनीच सवय आहे. कोणताही पुरावा नसताना त्यांनी या हल्ल्याचा ठपका भारतावर ठेवला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र हे दावे फेटाळून लावत पाकिस्तानला आरसा दाखवला. "दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा आपल्याच देशातील लोकांच्या मागण्यांकडे लक्ष द्या," असा सणसणीत सल्ला भारताने दिला आहे.
बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत प्रांत आहे, पण तरीही इथली जनता सर्वात जास्त कंगाल आहे. इथे नैसर्गिक वायू (गॅस), कोळसा, युरेनियम, लोह आणि जगातील ९५ टक्के ॲस्बेस्टॉस सापडतं. पाकिस्तानात सापडणाऱ्या ५० खनिजांपैकी ४० एकट्या बलुचिस्तानमध्ये मिळतात. पण दिव्याखाली अंधार म्हणतात तसाच प्रकार इथे आहे. बलुचिस्तानच्या 'सुई' गॅस क्षेत्रातील गॅस १९६४ मध्येच पंजाबमध्ये पोहोचला, पण स्वतः बलुचिस्तानमधील क्वेटा शहरात गॅस पोहोचायला १९८२ साल उजाडलं. युएनडीपीच्या (UNDP) आकडेवारीनुसार, इथली ७१ टक्के जनता गरिबी रेषेखाली जगतेय.
🚨Baloch fighters attack across multiple areas, followed by visuals of Pakistani troops abandoning posts.
This visual is the scene's trigger grim déjà vu — the unresolved ghosts of 1971 appear to be resurfacing inside Pakistan once again.@RealWahidaAFG @hyrbyair_marri pic.twitter.com/OVfZgttzdy— Shanaaz Baloch (@ShanaazBaloch) December 18, 2025
बळजबरीचं नातं आणि पंजाबी वर्चस्व
बलुचिस्तानचं पाकिस्तानात झालेलं विलीनीकरण हे सुरुवातीपासूनच ओढून ताणून केलेलं होतं. बलुच जनतेने हे नातं कधीच मनापासून स्वीकारलं नाही. पाकिस्तानात पंजाब प्रांताचं राजकारण आणि अर्थकारणावर वर्चस्व आहे. पूर्वी पूर्व पाकिस्तानासोबत (आताचा बांगलादेश) जे केलं, तोच खाक्या पाकिस्तान आता बलुचिस्तानबाबत वापरत आहे. हा प्रांत मागासलेला राहिला तरच तो इस्लामाबादवर अवलंबून राहील, अशी पाकिस्तानची भीती आहे.
२००४ पासून बलुचिस्तानमध्ये बंडाची नवी लाट उसळली आहे. 'बलुचिस्तान लिबरेशन आर्मी' पाकिस्तानातून वेगळं होण्यासाठी लढत आहे. २०२३ मध्ये ११६ असलेले हल्ले २०२४ मध्ये थेट ५०४ वर पोहोचले आहेत.
इथल्या ग्वादर बंदरात चीन करत असलेल्या गुंतवणुकीला (CPEC) स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यांच्या मते, चीन आणि पाकिस्तान मिळून त्यांच्या साधनसंपत्तीची लूट करत आहेत. स्थानिक तरुणांना ना रोजगार मिळतोय ना कोणताही फायदा. त्यांच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे फक्त त्यांच्या जमिनीवर मारलेला दरोडा आहे.
पाकिस्तानी लष्कर हे बंड मोडून काढण्यासाठी अत्यंत कठोर मार्ग वापरत आहे. 'व्हॉईस ऑफ बलुच मिसिंग पर्सन्स'च्या मते, २००२ ते २०१८ दरम्यान ६,४२८ लोक सुरक्षा यंत्रणांनी उचलले आणि ते आजही बेपत्ता आहेत.
बलुच नॅशनल मूव्हमेंटच्या मानवाधिकार विभागाच्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांतच ७८५ लोक बेपत्ता झाले आहेत, ज्यात विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याच काळात १२१ लोकांना कोणत्याही खटल्याशिवाय मारले गेले. अनेक मृतदेहांवर छळाच्या खुणा आढळल्या आहेत. पण कोणावरही कारवाई झालेली नाही.
पाकिस्तानने आता तरी भानावर येण्याची गरज आहे. केवळ बंदुकीच्या बळावर किंवा भारतावर आरोप करून शांतता येणार नाही. १९७१ मध्ये याच चुकांमुळे पाकिस्तानचा पूर्व भाग हातचा गेला होता. जर बलुच नागरिकांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, तर येणाऱ्या काळात अधिक भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागेल, हे नक्की.